मुंबई : विधानसभा निवडणूक निकाल लागून ९ दिवस होवूनही राज्यात अद्याप सत्ता स्थापन झालेली नाही. मुख्यमंत्री पदावरून सेना- भाजप यांच्यात संघर्ष वाढला असून आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. युतीला सत्तास्थापनेत अपयश आल्यास, आघाडीकडून शरद पवार मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असू शकतील असे वृत्त Zee 24 तास या वृत्तवाहिनीने दिले आहे.
शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाला शिवसेना आणि काँग्रेस पाठिंबा देण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची 4 नोव्हेंबरला दिल्लीत भेट होणार असून राज्यात नव्या राजकीय समीकरणांवर यावेळी चर्चा शक्य असल्याचा दावा करण्यात येत आहे.
शरद पवार मुख्यमंत्री झाल्यास आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होऊ शकतात. काँग्रेसकडून राष्ट्रवादीला पाठिंबा असल्याने शिवसेना पाठिंबा देण्याबाबत त्यांच्यावरही टीका होणार नाही. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ स्तरावर याबाबत चर्चा झाल्याची झी २४ तासकडे खात्रीलायक माहिती आहे. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सरकार आणि त्याला काँग्रेसचा पाठिंबा मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
याआधीही विधीमंडळाचा सदस्य नसलेली व्यक्ती मुख्यमंत्री झालेली आहे. मग कोणी राज्यसभेचा सदस्य असेल, कुणी लोकसभेचा, असं सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची आज भेट झाली. शिवसेनेनं सत्तेसाठी सर्व पर्याय खुले ठेवले असून भाजपसोबतचा पेच कायम राहिल्यास राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत नव्या आघाडीचा दावाही करण्यात येत आहे.
शिवसेनेला पाठिंबा द्यावा, यासाठी काँग्रेसचे काही नेते आग्रही आहेत. पण शिवसेनेला थेट पाठिंबा देऊन अडचणीत येण्यापेक्षा काँग्रेसला राष्ट्रवादीला पाठिंबा देणं सोप जाईल. काँग्रेस सत्तेत सहभागी होणार नाही, पण बाहेरून पाठिंबा देईल. तसंच शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये ५०-५० टक्के सत्तेचं वाटप होईल, यासाठी हालचाली सुरू झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनीही भाजप विरहीत सत्ता स्थापन करण्यास अनुकूलता दर्शविली आहे. त्यासाठी शुक्रवारी (ता.1) या नेत्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येते. शरद पवार यांची भूमिका जाणून घेतल्यानंतरच सोनिया गांधी या नव्या समीकरणाबाबत अंतिम निर्णय घेतील, असे काँग्रेसच्या सूत्रांचे मत आहे.
- Motilal Oswal यांची Fundamental Picks ! टॉप 5 शेअर्स देणार सर्वाधिक रिटर्न्स
- शिर्डीत धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट ! अजित पवारांना पक्षातून बाहेर करण्याचे षडयंत्र…
- बीड जिल्हा पुन्हा हादरला ! रस्त्यावर रक्ताचा सडा… तिन तरुणांचे खाकीचे स्वप्न चिरडले
- पुणेकरांसाठी खुशखबर : वाहतूक कोंडीला अखेरचा रामराम ?
- अहिल्यानगर जिल्ह्यात दोन खासगी हेलिकाँप्टर ! काय असते किंमत ?