माजी खासदार दिलीप गांधी अडचणीत

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँकेवर अखेर प्रशासक नेमण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने गुरुवारी या बँकेवर प्रशासक नेमून त्यांच्या हाती बँकेचा कारभार सोपविला आहे. त्यामुळे बँकेच्या गोटात खळबळ उडाली आहे.

भारतीय जनता पक्षाचे नगर दक्षिण मतदारसंघाचे माजी खासदार व बँकेचे अध्यक्ष दिलीप गांधी यांना या निर्णयाने मोठा धक्का बसला आहे.

बँकेवर प्रशासक नेमल्याचे सर्व संचालक व वरिष्ठ अधिका-यांना कळविण्यात आले आहे. बँकेच्या अध्यक्षांसह अन्य पदाधिका- यांची कार्यालये व वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. रिझव्र्ह  बँकेचे निवृत्त अधिकारी सुभाषचंद्र मिश्रा आता बँकेचे प्रशासक असणार आहेत.

येत्या डिसेंबरमध्ये बँकेची निवडणूक होणार आहे. त्यापूर्वीच बँकेवर प्रशासक नेमला गेल्याने ही निवडणूक होते की नाही, याची शंका व्यक्त केली जात आहे.

तब्बल १०९ वर्षांपूर्वी (१९१०) स्थापन झालेल्या नगर अर्बन बँकेवर पहिल्यांदाच प्रशासक नियुक्त झाला आहे . बँकेचा  एनपीए ‘ वाढला असल्याने, तसेच क्रेडीट सोसायटीला कर्ज देण्यास मनाई असताना, ते दिल्याने बँकेवर प्रशासक नेमला गेला आहे.

पूर्वी रिझर्व्ह बँकेने बँकेच्या कारभारात दाखवलेल्या त्रुटींचीही पूर्तता केली गेली नसल्याचे प्रशासक नेमल्याच्या आदेशात म्हटल्याचे सांगितले जाते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे विद्यमान खासदार असताना दिलीप गांधी यांचे तिकीट पक्षाने कापले होते. या पार्श्वभूमीवर आता त्यांच्या ताब्यात असलेल्या नगर अर्बन बँकेवरही प्रशासक नेमला गेल्याने भाजप गोटातही खळबळ उडाली आहे.

बँकेच्या ठेवी सध्या बाराशे कोटी असून, साडेआठशे कोटींचे कर्जवाटप आहे. बँकेच्या राज्यभरात ४८ शाखा आहेत. त्यांचेही कामकाज आता प्रशासकाद्वारे चालवले जाणार आहे.

बँकेला मागील वर्षी ११ कोटीचा नफा झाल्याचे सांगितले जात होते; पण रिझर्व्ह बँकेने तो प्रत्यक्षात ८ कोटी ६४ लाखांचा असल्याचे स्पष्ट केले होते. मागील दोन वर्षांपासून बँकेद्वारे दिला जाणारा १५ टक्के लाभांश वाटपासही रिझर्व्ह बँकेने बंदी घातली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment