Prepaid Smart Meter:- महावितरण आणि ग्राहक यांच्या बाबतीत पाहिले तर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवतात. यामध्ये काही समस्या अशा आहेत की त्याचा तोटा हा विद्युत वितरण कंपनीला देखील होतो व काही समस्यांमुळे वीज ग्राहकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
महावितरण च्या बाबतीत पाहिले तर विज चोरीचे अनेक प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत असतात व ते ताबडतोब लक्षात देखील येत नाहीत. तसेच अनेक ग्राहक विजेची बिले वेळेवर भरत नाहीत व त्यामुळे थकबाकीचा आकडा सातत्याने वाढत जातो व वितरण कंपन्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसतो.
तसेच मीटरचे रीडिंग घेताना बऱ्याचदा ते सदोष पद्धतीने घेतले गेल्यामुळे जास्त प्रमाणामध्ये विजबिल येते व त्यासंबंधीच्या देखील अनेक तक्रारी प्राप्त होत असतात. अशाप्रकारे एकापेक्षा अनेक समस्या आपल्याला याबाबतीत सांगता येतील. या सगळ्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर जी ग्राहक विजेची बिले थकवतात
आणि वीज चोरी करतात अशा ग्राहकांना अटकाव व्हावा या अनुषंगाने आता केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रीपेड मिटर अर्थात तुम्हाला आता विजेचा वापर करण्याअगोदरच पैसे भरावे लागतील अशा प्रकारची योजना आणली असून याअंतर्गत आता सध्या अस्तित्वात असलेले विजेचे मीटर बदलले जातील व त्या ऐवजी स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत. याविषयीचीच माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
कशा पद्धतीचे आहेत हे स्मार्ट मीटर?
सध्या अस्तित्वात असलेली पद्धत पाहिली तर ग्राहकाने किती विजेचा वापर केला याची रीडिंग दर महिन्याला वीज कंपनीच्या माध्यमातून घेण्यात येते व त्यानुसार ग्राहकाला विज बिल पाठवण्यात येते. परंतु आता या नवीन येणाऱ्या स्मार्ट मीटरमध्ये आपण किती विजेचा वापर केला याची सगळी माहिती वीज ग्राहकाला त्याच्या मोबाईलच्या माध्यमातून केव्हाही पाहता येणार आहे.
एवढेच नाही तर वीज वापरासाठी लागणारा पैसा कोणत्याही ठिकाणहून आणि कधीही ग्राहकाला भरता येणार आहे. या मीटरच्या माध्यमातून आता ग्राहक त्याच्या गरजेनुसार आणि आर्थिक बजेटनुसार विजेचा वापर करू शकणार आहे. साधारणपणे 2025 पर्यंत देशातील सगळे मीटर बदलण्याचे या माध्यमातून उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे व यासंबंधीचे काम काही शहरे व गावांमध्ये सुरू देखील करण्यात आलेले आहे.
कसे काम करेल हे स्मार्ट मीटर?
त्याप्रमाणे आपण मोबाईलला रिचार्ज करतो व त्यानंतरच त्याचा वापर आपल्याला करता येतो. अगदी त्याच पद्धतीने तुमच्या घरामध्ये विजेचा वापर जसा जसा वाढेल तसं तसं रिचार्जचे पैसे संपत जातील. घरामध्ये किती विजेचा वापर झाला व आता तुमचे रिचार्ज मधील किती पैसे शिल्लक आहेत याची माहिती वीज ग्राहकाला मोबाईलवरील ॲपमध्ये बघता येणार आहे.
या प्रीपेड स्मार्ट मीटरमध्ये वीज ग्राहकाने जे काही पैसे भरलेले आहेत ते पैसे संपले की वीजपुरवठा ऑटोमॅटिक खंडीत होईल. परंतु संबंधित ग्राहकाला वीजपुरवठा खंडित होण्याआधी विज वापराची व किती पैसे शिल्लक आहेत याची माहिती आधीच कळेल व ग्राहकाला वेळेला पैसे भरणे सोपे जाईल व वीज पुरवठा ही खंडित होणार नाही.
तसेच ग्राहकांना मोबाईल वरून अगदी घरी बसून ऑनलाइन पैसे भरण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. प्रीपेड मीटर मधील रिचार्ज चे पैसे संपत आल्यावर कंपनीकडून त्यासंबंधीचा एसएमएस मोबाईलवर ग्राहकाला पाठवण्यात येईल. समजा एखाद्या ग्राहकाने विजेसाठी भरलेले पैसे जर मध्यरात्री संपले तर रात्रीच्या वेळेस वीजपुरवठा बंद होणार नाही. म्हणजे सायंकाळी सहा ते सकाळी दहा या वेळेत पैसे संपले तरी वीजपुरवठा चालू राहील.
त्यामुळे संबंधित ग्राहकाने जर दुसऱ्या दिवशी सकाळी दहापर्यंत पैसे भरणे गरजेचे आहे. त्यामधून तुम्ही रात्री पैसे संपल्यानंतर पैसे भरेपर्यंत जी काही वीज वापरलेली आहे तिचे पैसे कट केले जातील अशा पद्धतीची सुविधा या मीटरमध्ये देण्यात आलेली आहे.