अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- सासू आणि सुनेचे पटेलच असे नाही. बऱ्याच ठिकाणी या दोघींतील वाद घराचे विभाजन करण्याचे कारण ठरते. पण, कोरा येथे नियतीने या दोघींवर एकाच वेळी घाला घातला. सासू आणि सुनेचा एकाच दिवशी मृत्यू झाला.ही घटना गावातील वातावरण सुन्न करून शोककळा निर्माण करणारी ठरली
सासूबाईंच्या अंत्ययात्रेकरिता आलेल्या नातलगांना सुनबाईंचीही अंत्ययात्रा करून परतण्याची वेळ कोरा येथे आली. एकाचवेळी सासूसह सुनेला चिताग्नी देण्याचा प्रसंग ग्रामस्थांनी अनुभवला. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
वर्धा जिल्ह्यातील कोरा येथील पार्वता महादेव नखाते यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी (ता. 24) रात्रीच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच दुर्गा हरिदास नखाते यांचाही मृत्यू झाला.
कोरा येथील रहिवासी असलेल्या पार्वताबाई महादेवराव नखाते यांचा वृद्धापकाळाने मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेची माहिती सर्व नातलगांना देण्यात आली. बुधवारी अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच पार्वताबाई यांची सून दुर्गा हरिदास नखाते यांनी जगाचा निरोप घेतला.
दुर्गाबाई गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांनीही सासूबाईंसोबतच ईहलोकाची यात्रा संपविल्याचे लक्षात आल्यावर वातावरण सुन्न झाले. शेवटी दोघींचाही अंत्यसंस्कार एकाचवेळी करण्याचा निर्णय घेण्यात आला. शोकाकुल वातावरणात नखाते यांच्या घरून दोन अंत्ययात्रा निघाल्या.
एकाच ठिकाणावर दोघींनाही चिताग्नी देण्यात आला. विशेष म्हणजे, जगाचा निरोप घेणाऱ्या दुर्गाबाईंच्या मुलीचा विवाह येत्या १९ जानेवारीला आयोजित आहे. अशावेळी सासूसह सुनेने जगाचा निरोप घेतल्यामुळे या आनंदाच्या क्षणाला दु:खाची किनार लाभली.
घरातील दोन महिलांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने नखाते परिवारावर आघात कोसळला. पण, नियतीच्या या खेळामुळे दोघींच्या मृत्यूची चर्चा पंचक्रोशीत झाली. कुटुंबीयांचे सांत्वन करणाऱ्यांच्या गराड्यात हे दु:ख जरा हलके झाल्याचे काही जण बोलत होते.
असे असले तरी ज्यांचे दु:ख त्यांनाच सोसावे लागते, असेही काहींच्या तोंडून निघाले.दुर्गा ही बऱ्याच दिवसापासून आजारी होती. या दोघींचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.