१४ जानेवारी २०२५ मुंबई : विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या अपयशानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी काँग्रेसला राज्यात नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.काँग्रेस हायकमांडकडून राज्यात नेतृत्व बदलाला मान्यता मिळाली असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव त्यासाठी आघाडीवर असल्याचे समजते.
तरुण फळीतील नेत्यांनी अडचणीच्या काळात राज्याची जबाबदारी घेण्यास उत्सुकता न दाखवल्याने ७८ वर्षीय, अनुभवी पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी लावली जाणार असल्याचे समजते.सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने १७ जागा लढवत १३ जागा जिंकल्या. मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठे अपयश आले.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसने १०० हून अधिक जागा लढवल्या; पण केवळ १६ जागांवरच यश मिळाले. काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. काही नेते थोडक्या मतांनी कसेबसे वाचले. चव्हाण, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक बड्या नेत्यांना पराभवाची चव चाखावी लागली.
या पराभवाची जबाबदारी घेऊन पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होण्याची तयारी दाखवली होती.पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पटोले यांनी राजीनामा दिल्याचीही चर्चा होती.
विधानसभा निकालानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बैठका घेऊन पराभवाची कारणमीमांसा केली, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.
पण काँग्रेसच्या गोटात मात्र अद्याप शांतताच आहे.पक्षाने ना चिंतन केले, ना कार्यकत्यांना धीर दिला.राज्यातील सुमारे ८० टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या ३ ते ४ वर्षांपासून प्रलंबित आहेत. या निवडणुका येत्या ३-४ महिन्यांत घेण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
‘महापालिका, झेडपीच्या तयारीला लागा’ असे आदेशही भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत.त्यामुळे काँग्रेसही आता खडबडून जागी झाली आहे.पटोले यांची ४ वर्षांपूर्वी, फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली होती. आता आणखी काही काळ पद भूषवण्यास पटोले यांनी असमर्थता दर्शवली आहे.त्यामुळे काँग्रेसने नव्या प्रदेशाध्यक्षाचा शोध सुरू केला आहे.काँग्रेसला पन्नाशीमधील तरुण चेहरा द्यायचा आहे.
त्यासाठी काँग्रेसकडून माजी मंत्री बंटी ऊर्फ सतेज पाटील, अमित देशमुख, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार यांचा विचार केला गेल्याचे सांगण्यात येते.मात्र पाटील आणि देशमुख यांनी ही जबाबदारी घेण्यास नकार दिल्याचे समजते.कदम यांनी आपण ही जबाबदारी घेण्यास अद्याप मानसिक दृष्ट्या तयार नसल्याचे सांगितले.त्यामुळे ठाकूर आणि वडेट्टीवार या दोन ओबीसी नेत्यांचा पर्याय पक्षाकडे उरला.
सध्या पटोले यांच्या रूपाने विदर्भातील ओबीसी नेत्याकडेच प्रदेशाध्यक्षपद आहे. शिवाय ठाकूर व वडेट्टीवार हे दोन्ही नेतेही विदर्भातीलच ओबीसी नेतेच आहेत. त्यामुळे काँग्रेसने विदर्भ आणि पुन्हा ओबीसी कार्डऐवजी इतर पर्यायांचा विचार सुरू केला होता.त्यात चव्हाण आणि थोरात यांच्याकडे विचारणा झाली.मात्र थोरात यांनी आपण हे पद पटोले यांच्या आधीच सांभाळले असल्यामुळे अन्य नेत्याकडे जबाबदारी द्यावी, असे मत मांडले.
बंटी पाटील, अमित देशमुख अनुत्सुक
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी सर्वात सक्षम व प्रबळ दावेदार म्हणून कोल्हापूरच्या बंटी ऊर्फ सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा होती. पाटील यांनीच प्रदेशाध्यक्ष व्हावे अशी इच्छा खरगे यांची होती.मात्र त्यांनी नकार दिला. त्यामागे मध्यंतरी त्यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिशीचे कारण सांगितले जाते. पाटील यांच्याप्रमाणेच देशमुख यांवीही अडवण आहे.लातूरमधून धीरज देशमुख पराभूत झाले आहेत.
अमित देशमुख ५ ते ६ हजारांनी कसेबसे निवडून आले. यशोमती ठाकूर आणि विजय वडेट्टीवार यांची भाजपला भिडण्याची तयारी आहे; पण हे दोन्ही नेते विदर्भातील व ओबीसी असल्याने काँग्रेस पुन्हा तोच प्रयोग करू इच्छित नाही. अशावेळी जुन्याजाणत्या पृथ्वीराज चव्हाण यांच्याशिवाय पक्षाला पर्याय दिसत नाही.
२६ जानेवारीला ‘जय बापू, जय भीम’ रॅली
राज्यघटनेच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त येत्या २६ जानेवारी रोजी काँग्रेसच्या वतीने ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅलीचे राज्य, जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर आयोजन करण्यात आले आहे. हे अभियान प्रभावी करण्यासाठी २६ जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२६ यादरम्यान ‘संविधान वाचवा राष्ट्रीय पदयात्रा’ ही देशव्यापी जनसंपर्क मोहीम सुरू केली जाणार आहे. या अभियानात प्रदेश काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, आजी माजी आमदार, खासदार, सेल आणि विभागाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी दिली.