पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे -चाकण-शिक्रापूर एन एच ५४८ डी या राष्ट्रीय महामार्गासंदर्भात नुकताच निर्णय घेण्यात आला आहे. राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या मार्गावरील तळेगाव ते चाकणदरम्यान चार पदरी उन्नत मार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे तळेगाव ते चाकणदरम्यानचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. तळेगाव-चाकण ते शिक्रापूर रस्त्याचे काम मागील अनेक वर्षे लालफितीत अडकून पडले आहे.
तळेगाव ते चाकणदरम्यान चार पदरी उन्नत मार्ग व जमिनीस समांतर चार पदरी रस्ता बांधण्यात येणार आहे. तसेच चाकण ते शिक्रापूरदरम्यान जमिनीस समांतर सहा पदरी रस्ता तयार करण्याच्या निर्णयास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने या प्रलंबित आणि बहुचर्चित महामार्गाचे काम सुरू होण्याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे.

या कामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर तळेगाव, वडगाव खेड आणि शिरुर तालुक्यातील नागरिकांना दिलास मिळाला असला तरी या कामाच्या निविदा प्रक्रिया तातडीने राबवून रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी प्रवासी व नागरिकांनी केली आहे.
तळेगाव, चाकण, रांजणगाव आदी एमआयडीसी याच रस्त्यावर असल्यामुळे या रस्त्याने नेहमीच अवजड वाहनांची वर्दळ असते. तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक अव्याहतपणे सुरू आहे. अवजड वाहतुकीचे कंटेनर ट्रेलर आणि गॅसची वाहतूक करणारे एलपीजी टैंकर धोक्याचा बावटा दाखवत धावत आहेत.
मात्र, मागील अनेक वर्षांपासून येथील तळेगाव ते शिक्रापूर यादरम्यानच्या महामार्गाचे काम घोषणांच्या पुढे सरकलेले नाही. उर्से, तळेगाव, चाकण, शिक्रापूर, रांजणगाव एमआयडीसी आणि मराठवाडा, विदर्भ व मावळ, मुंबईकडे जाण्यासाठीचा जवळचा मार्ग म्हणून तळेगाव-चाकण शिक्रापूर या ५६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर वाहनांची संख्या मागील काही वर्षांत वाढली आहे.
मावळ तालुक्यातील माळवाडी, इंदोरी बायपास, भंडारा डोंगर, सुधा पूल ते खेड तालुक्यातील महाळुंगे, खालुंब्रे, शेलपिंपळगाव, साबळेवाडी, बहुळ आदी ठिकाणी अरुंद रस्ते, तीव्र उतार व धोकादायक वळणे असून, अपघातप्रवण क्षेत्रे आहेत.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता कधी केंद्र, तर कधी राज्य शासन करणार असल्याच्या घोषणा झाल्या. मात्र मागील आठवड्यात मंजुरी मिळाली त्यामुळे आता कामाला गती येईल अशी अपेक्षा तळेगावसह चाकण, शिक्रापूरमधील नागरिकांची आहे. यासाठी प्रशासनाने पुढील प्रक्रिया तातडीने राबवाव्यात अशी मागणी प्रवाशांसह नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे
कामाच्या निविदा राबवा
तळेगाव-चाकण महामार्गाच्या कामाच्या निविदा आणि भूसंपादन प्रक्रियेला अजून किती दिवस लागणार? असा प्रश्न कायम आहे. राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाल्यानंतर गेल्या सात वर्षांपासून तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याचे काम गेली कित्येक वर्षे प्रलंबितच राहिले. गतवर्षी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडून हा रस्ता राज्य सरकारकडे अधिकृतरीत्या हस्तांतरित करण्यात आला. नव्यानेच स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळ अर्थात एमएसआयडीसीच्या माध्यमातून बीओटी तत्वावर या रस्त्याचे काम आता होणार आहे.
भूसंपादनासाठी लागणार ४१० कोटी रुपये
सदर रस्त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल पूर्ण झाला असला तरी, कामाचा टिप्पणीचा मसुदा मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी प्रलंबित होता. ज्याला मंजुरी देण्यात आली. भूसंपादनासाठी जवळपास ४१० कोटी रुपये अपेक्षित असून, गेल्या फेब्रुवारी महिन्यात त्याचा मसुदा अर्थ खात्याकडे सादर गेला आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर या ५६ किलोमीटर अंतराच्या प्रलंबित महामार्गाच्या कामासाठी तळेगाव-चाकण-महामार्ग कृती समिती गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे