नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीत (Punjav Assembly Election) काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. पंजाबमध्ये सत्तेत असलेला काँग्रेस पक्ष आता फक्त १७ जागांवर सीमित झाला आहे.
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने मोठी बाजी मारत ९१ जागांवर आघाडी मिळवली आहे. मात्र पंजाब काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सिद्धू हे अमृतसर पूर्व मतदारसंघातून पराभूत झाले आहेत.
तसेच पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी (Charanjit Channi) यांनी रुपनगर आणि बरनाला दोन जागी निवडणूक लढवली होती. या दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला आहे.
चरणजीत सिंह चन्नी हे पंजाबचे १६वे मुख्यमंत्री होते. पंजाबचे पहिले एससी मुख्यमंत्री म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. पंजाब नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता.
चन्नी यांचा जन्म १ मार्च १९६३ साली मकराना कला या गावात झाला. चन्नी खरड नगर परिषदेच्या निवडणुकीत उभे राहिले होते. याआधी चरणजीत सिंह चन्नी तंत्रशिक्षण मंत्री होते. दोन वेळा नगर परिषदेचे अध्यक्षही होते.