अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी शहरात स्वत:च्या नावे संपर्क कार्यालय सुरू केले आहे. त्यात भाजप अथवा जनसेवा मंडळाला त्यात कुठलेही स्थान दिले नाही.
मात्र, भाजप कार्यकर्त्यांसोबत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या वीसहून अधिक नगरसेवकांची मोट बांधत विखे यांनी श्रीरामपुरात तयार केलेला ‘चलो एक पहल की जाये नये रास्ते की ओर’ हा नवा फॉर्म्युला चर्चेचा विषय झाला.
मात्र, हा फॉर्म्युला श्रीरामपूरच्या विकासाच्या बाबतीत आहे, असे स्पष्टीकरण दिल्याने उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला. विधानसभा निवडणुकीनंतर विखे यांनी श्रीरामपूर मतदारसंघात संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त विखे यांचे शहरभर फलक झळकले.
प्रश्न अनेक व उत्तर एक असे त्यावर म्हटले आहे. भाजपचे कमळ तसेच पक्षप्रमुखांच्या फोटोंना मात्र त्यात स्थान देण्यात आलेले नव्हते. त्यामुळे राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते.
या वेळी झालेल्या सभेत भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनीही उघडपणे मागील पाच वर्षांतील सत्ता काळात श्रीरामपुरातील कार्यकर्त्यांची उपेक्षा झाल्याची भावना विखेंसमोर बोलून दाखवली. भाजप सरकारमध्ये कार्यकर्त्यांना कुठलीही ताकद मिळाली नाही. त्यांना संघर्ष करावा लागला. त्यांचा सूर भाजपच्या जिल्हा नेतृत्वाविरोधात होता.
भाजपमध्ये विखे यांनीच पुढील काळात कार्यकर्त्यांना बळ द्यावे, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. येथून पुढील सर्व निवडणुका आमदार विखे यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची मागणीही अनेकांनी केली होती.
आगामी काळात येथे जिल्हा बँक व नगरपालिकेच्या निवडणुकी होणार आहेत. त्याची मोर्चेबांधणी यानिमित्ताने सुरू झाली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीतील नगरसेवकांसोबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची विखे यांनी येथे मोट बांधली आहे.
भाजपचा मुख्य संघर्ष काँग्रेसमधील काही प्रमुख नगरसेवकांशी राहिलेला आहे. त्यामुळे त्यांनाही जुळवून घेताना अडचणी येणार आहेत.अद्याप निवडणुकीस अवकाश आहे. त्यामुळे विखे यांनी तयार केलेला राजकीय फॉर्म्युला तूर्तास सर्वांना मान्य झाला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com