कर्जत – विधानसभेच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागलेल्या माजीमंत्री प्रा.राम शिंदे यांनी मतदारसंघाकडे पाठ फिरवली होती. पराभवानंतर त्यांनी मतदारसंघाचा दौरा करून मतदारांच्या गाठीभेटीही घेतल्या नाहीत.
मात्र, करोनामुळे अडचणीत असलेल्या काळात त्यांनी सक्रिय होत जनतेला आधार द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कर्जत – जामखेड मतदारसंघातील जनतेतून बरे झाले, प्रा. राम शिंदे सक्रिय झाले अशी लोकभावना उमटत आहे.
सध्या अंत्योदय अन्न योजनेतील कर्जत- जामखेडच्या लाभधारकांना मे मधील गहू व तांदूळ मोफत दिले जाणार आहे. भाजप कर्जत- जामखेड तालुका व प्रा.राम शिंदे यांच्याकडून ही रक्कम भरली जाणार आहे.
यातून गोरगरीब जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.ग्रामपंचायत असो की विधानसभा मतदारसंघ, त्यातील विरोधक जागृत व सक्रिय असेल तरच जनतेला त्याचा अधिक फायदा होतो.
विरोधक नामशेष झाला तर हुकूमशाही येण्याचा धोका असतो. सामाजिक आरोग्य चांगले राहण्यासाठी विरोधक टिकणे महत्त्वाचे असते. त्यामुळे कर्जत -जामखेड मतदारसंघात प्रा. राम शिंदे यांनी सक्रिय व्हावे, ही अनेक दिवसांची जनतेची मागणी होती.
प्रत्यक्ष घराबाहेर पडून जनतेत जाण्याची ही वेळ नाही. मात्र गरजूंना अडचणीच्या वेळेत मदत करत आपण सदैव जनतेच्या पाठीशी आहोत. हे त्यांनी दाखवून दिले आहे.”कोरोना हरणार, देश जिंकणार’ ही टॅगलाईन घेऊन त्यांनी काम सुरू केले आहे. त्याला सोशल मिडियातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®