Pune Mhada Lottery: पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ 5 जिल्ह्यांमधील 4777 घरांसाठी म्हाडाकडून सोडत जाहीर! वाचा या लॉटरीचे संपूर्ण वेळापत्रक

Ajay Patil
Published:

Pune Mhada Lottery:- प्रत्येक जणाला वाटत असते की, आपले स्वतःचे घर असावे आणि तेही पुणे किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये. परंतु वाढत्या महागाईच्या कालावधीमध्ये प्रत्येकालाच स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करता येते असे नाही. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परीने स्वतःच्या घरासाठी प्रयत्न करत असतात.

बरेच जण होमलोनचा आधार घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करतात. परंतु यामध्ये राज्य सरकारच्या म्हाडा अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण आणि सिडको सारख्या गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून देखील स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करता येते.

आपल्याला माहित आहे की म्हाडाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत परवडणाऱ्या दरांमध्ये घरांची सोडत काढण्यात येते. अगदी याच पद्धतीने म्हाडाच्या पुणे मंडळाने विविध उत्पन्न गटांकरिता पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमधील तब्बल 4777 घरांकरिता सोडत जाहीर केली आहे. या सोडतीसाठीची अर्ज प्रक्रिया काल म्हणजे शुक्रवार 8 मार्च 2024 पासून सुरू झाली आहे.

 म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4777 घरांसाठी सोडत जाहिर

याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हाडाच्या पुणे मंडळाच्या माध्यमातून विविध उत्पन्न गटाकरिता  पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांकरिता 4777 घरांकरिता सोडत जाहीर करण्यात आलेली असून त्यासाठीचा अर्ज भरण्याची प्रक्रिया 8 मार्च 2024 पासून सुरू झाली आहे

गुरुवारी या सोडतीचा प्रारंभ म्हाडाच्या पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते  करण्यात आला असून 7 मार्चपासून यासाठीच्या आवश्यक नोंदणीला सुरुवात करण्यात आलेली आहे. काल तीन वाजल्यापासून यासाठीचे अर्ज भरता येत आहेत. या सोडती करता ऑनलाइन अर्ज नोंदणीची मुदत आठ एप्रिल 2024 पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे.

तर सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत 10 एप्रिल 2024 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत असणार आहे. या सोडतीसाठी आवश्यक असलेले शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याची शेवटची मुदत 12 एप्रिल 2024 आहे असे देखील म्हाडा पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.

 या सोडतीतील योजनेनुसार घरांचा तपशील

1- म्हाडा योजनेअंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य एकूण 2416 सदनिका

2- म्हाडाच्या विविध योजने अंतर्गत एकूण 18 सदनिका

3- म्हाडा पंतप्रधान आवास योजना एकूण 59 सदनिका

4- पंतप्रधान आवास( पीएमएवाय) खाजगी भागीदारी योजना एकूण 978 सदनिका

5- 20% योजना पुणे महापालिका एकूण 745 सदनिका आणि पिंपरी चिंचवड एकूण 561 सदनिका

असे मिळून 4777 सदनिकांसाठी ही सोडत जाहीर करण्यात आलेली आहे.

 या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे संकेतस्थळ

पुणे मंडळ अंतर्गत म्हाडाच्या घरांच्या सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज भरायचा असेल तर अर्जदारांनी www.mhada.gov.in किंवा https://mhada.gov.in या संकेतस्थळाला भेट देणे गरजेचे आहे. तसेच ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावरील योजनांच्या घरांकरिता नोंदणी करायची असेल तर  lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर करण्याचे आवाहन देखील म्हाडा पुणेचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी केले आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe