अहमदनगर लाईव्ह 24 टीम / जळगाव :- शहरातील गणपती नगर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या उद्याेजकाच्या घरात घर भाड्याने घेण्याचा बहाणा करून दोन पुरुषांसह एक महिला घुसली.त्यांच्यासाठी पाणी आणायला जात असलेल्या उद्योजकाच्या पत्नीच्या डोक्यात मारून जखमी केले. त्यानंतर महिलेचे हातपाय, तोंड बांधले. नंतर विवस्त्र करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देत सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मालमत्तेच्या कागदपत्रांसह 5 लाख 300 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
उद्याेजकाची एमआयडीसीत चटई बनवण्याची कंपनी आहे. बुधवारी त्यांचे वडील बहिणीला सासरी साेडण्यासाठी मुंबईला गेले हाेते. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता उद्याेजक कंपनीत जाण्यासाठी निघाले हाेते. त्यांची पत्नी घरी एकटीच हाेती. सायंकाळपर्यंत पत्नीचा फाेन न आल्याने त्यांनी शेजारी राहणाऱ्या भाडेकरूला फाेन लावला.
त्याला घरी जाण्यास सांगितले. त्यांची पत्नी घराचा दरवाजा उघडत नसल्याचे १० मिनिटांनंतर भाडेकरूने त्यांना फाेन करून कळवले. त्यानंतर पुन्हा भाडेकरूने घराची डाेअरबेल वाजवून आवाज दिला. उद्याेजकाच्या पत्नीने घराचा दरवाजा अर्धवट उघडला. तेथूनच फाेनवर त्यांच्याशी त्या बाेलल्या. जिथे असाल तेथून घरी परत या, असे सांगितल्यानंतर उद्याेजक सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घरी परतले. त्या वेळी महिलेने सर्व घटना पतीला सांगितली.
दोघांसोबत असलेल्या महिलेने पिण्यासाठी पाणी मागितले. किचनमध्ये पाणी आणण्यास जात असताना एकाने त्यांच्या डाेक्यात काहीतरी मारले. त्यामुळे त्यांना भाेवळ आली. त्यानंतर दाेन्ही हात पाठीमागे बांधून टिपाॅयला पाय बांधले. ताेंड ओढणीने बांधले. तुम्ही कुणाकुणाच्या प्राॅपर्टी हडप केल्या आहेत, हे आम्हाला माहीत आहे, असे ते एकमेकांशी बाेलत हाेते.
त्यांच्यासोबत असलेल्या महिलेने अंगावरील कपडे काढून त्यांना विवस्त्र केले. त्यातील एका व्यक्तीने त्यांचे विवस्त्र फाेटाे काढून पाेलिसांना व इतर कुणाला सांगितल्यास फाेटाे व्हायरल करण्याची धमकीही दिली. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.