राष्ट्रवादीच्याच कार्यक्रमातून रोहित पवारांना काढता पाय घ्यावा लागला…

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांच्या जळगाव येथील कार्यक्रमात तुफान गोंधळ पहायला मिळाला. कार्यकर्त्यांना आवरता आवरता आयोजकांच्या नाकी नऊ आले.

यामुळे रोहित पवार यांनी माइकचा ताबा घेत कमी वेळात आपले मनोगत व्यक्त करत काढता पाय घेतला. जळगावच्या राष्ट्रवादी कार्यालयात कार्यक्रमस्थळी गोंधळ उडाल्याचे पाहून रोहित पवार यांनी थेट माईकचा ताबा घेतला आणि भाषणाला सुरुवात केली.

मात्र अवघ्या पाच मिनिटांत त्यांनी भाषण आटोपतं घेतलं. त्यानंतर ते कार्यकर्त्यांना चुकवत कार्यालयाच्या मागच्या दरवाजाने कसेबसे बाहेर पडले.

जळगावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे बेशिस्त वर्तन आणि आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आमदार रोहित पवार यांना मनस्ताप सहन करावा लागला.

पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करत गोंधळ घातल्याने रोहित पवारांना कार्यक्रम आटोपता घेऊन काढता पाय घ्यावा लागला.

कार्यकर्त्यांची रेटारेटी, घोषणाबाजी आणि बेशिस्त वर्तन पाहून त्यांनी डोक्याला हात मारुन घेतला. रोहित पवार रविवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले होते. या दौऱ्यात दुपारी तीन वाजता ते जळगावातील पक्षाच्या जिल्हा कार्यालयाला भेट देणार होते.

या ठिकाणी त्यांच्या छोटेखानी सत्कारासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीचे नियोजन होते. परंतु आयोजकांनी कोणत्याही प्रकारचे नियोजन केलेले नसल्याने कार्यक्रमाचा फज्जा उडाला.