कर्जत-जामखेडला हक्काचे पाणी द्या- रोहित पवारांची मागणी

Published on -

कर्जत – जामखेड तालुक्यातील कुकडी डावा कालवा व चिंचणी धरणाच्या लाभक्षेत्रातील सर्व गावांना समन्यायी पद्धतीने पाणीवाटप व्हावे. दोन्ही तालुक्यांना हक्काचे पाणी द्या, अशी मागणी राष्टवादीचे नेते रोहित पवार यांनी कुकडी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.

पुण्यातील सिंचन भवन येथे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी शिष्टमंडळासमवेत कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी, मुख्य अभियंता व्ही. जी. रजपूत, मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते व कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. टी. धुमाळ यांच्यासमवेत चर्चा केली. यावेळी झालेल्या बैठकीत पवार यांनी वरील मागणी केली.

पवार म्हणाले, कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या अंतर्गत कर्जत व जामखेड तालुक्यातील ५२ गावे डावा कालवा व चिंचणी धरण कालव्याच्या लाभक्षेत्रात आहेत. याचबरोबर भोसे खिंड बोगद्यातून पावसाळ्यात १.२ टीएमसी अतिरिक्त पाणी सीना धरणात सोडले जाते.

गेल्या काही वर्षांपासून कर्जत-जामखेड तालुक्याचा बहुतेक भाग दुष्काळात होरपळत आहे. त्यातच कुकडी डावा कालवा व चिंचणी धरण कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व गावांसह शेवटच्या भागातील गावांना सिंचनाचे पाणी वितरिकांमधून योग्य त्या दाबाने व पुरेसे मिळत नाही.

पाणी योग्य त्या दाबाने व हक्काचे पुरेसे पाणी समन्यायी पद्धतीने शेतीपर्यंत पोचविण्यासाठी व वितरिकांची दुरुस्ती करण्यासाठी पाटबंधारे खात्याने तत्परतेने पावले उचलावीत असे ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!