अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. अद्याप त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही.
मानसिक तणावामधून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. परंतु आता रोज या प्रकरणात नवीन ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. आता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या तपासाबाबत राजकारणही तापू लागलं आहे.

अनेक आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. आता यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या करणं हे क्लेशदायक आहे.
मात्र त्याच्या आत्महत्येचं कुणीही राजकारण करू नये. बिहारच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असून या प्रकरणाला राजकीय रंग देऊन कोणीही राजकीय पोळी भाजू नका, असं आवाहन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.
रोहित पवार यांनी फेसबुकवरून हे आवाहन केलं आहे. रोहित यांनी सुशांतसिंहवर एक दीर्घ पोस्ट लिहून सुशांतच्या आत्महत्येवरून काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
सुरवातीला मुंबई पोलीस आणि चित्रपटसृष्टीपुरतं मर्यादित असलेलं हे प्रकरण आता हळूहळू राजकीय रंग घेतंय की काय अशी शंका येऊ लागलीय, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
मध्यंतरी, भाजपाच्या आमदारानं थेट गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून या आत्महत्येचा तपास CBI कडून करावा अशी मागणी केली आहे. शिवाय त्यांनी राज्यातील युवा नेत्यावर गंभीर आरोपही केले.
तसेच बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी मुंबई पोलिसांवर आरोप केले होते. “सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची बिहार पोलिसांकडून चौकशी केली जात असून, मुंबई पोलिसांकडून निष्पक्ष चौकशीत अडथळा आणला जात आहे.
त्यामुळे सीबीआयनं हे प्रकरण स्वतःकडे घ्यावं, असं भाजपाला वाटतं,” असं सुशील कुमार मोदी यांनी म्हटलं होतं. याचाच समाचार घेत आ. पवार पुढे म्हणाले, या घटनेत कुणी दोषी असेल तर त्याचा निष्पक्षपणे तपास व्हायलाच हवा.
गुणवत्तेमध्ये जगात ज्या ठराविक पोलिसांचं नावं घेतलं जातं त्यात मुंबई पोलिसांचाही समावेश आहे. त्यामुळं मुंबई पोलीस या घटनेचा सखोल तपास करतील, यात कोणतीही शंका नाही.
या घटनेत चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांची त्यांनी आतापर्यंत चौकशीही केलीय. त्यामुळं मुंबई पोलीस हे सक्षम असून त्यांच्याकडून योग्य तपास होऊन याप्रकरणी न्याय मिळेल, असा विश्वास आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
एका लोकप्रिय अभिनेत्याच्या आत्महत्येचं कुणी राजकारण करत असेल तर ते चुकीचं आहे. बिहारमध्ये तोंडावर आलेल्या निवडणुका पाहिल्या तर या घटनेचा कुणीही
आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोग करून घेता कामा नये आणि असं कुणी करत असेल तर तो प्रयत्न आपण सर्वांनीच हाणून पाडायला हवा. सुशांतला न्याय मिळालाच पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा