मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे कुकडी व साईकृपा साखर कारखान्यांवर कारवाई नाही

Ahmednagarlive24
Published:

श्रीगोंदा :- येथील साईकृपा व कुकडी या साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांचे कोट्यावधी रुपये थकवून शेतकर्‍यांचा दिवाळा काढला असल्याचा आरोप भूमिपुत्र शेतकरी संघटनेने केला असून,

ऊस उत्पादक शेतकर्‍यांना थकित पैसे मिळण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री बबनराव पाचपुते व आमदार राहुल जगताप यांच्या घरासमोर सुरु केलेल्या आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे.

या आंदोलनात सहभागी होऊन भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर, युवक जिल्हाध्यक्ष अमोल उगले, जिल्हा संघटक संतोष वाबळे, साईनाथ घोरपडे, सिताराम देठे, युवक तालुकाध्यक्ष रावसाहेब झांबरे, तालुका प्रवक्ते राजू रोकडे, गोरख वाळुंज, संदीप जाधव, गणेश जगदाळे, राम तांबे आदिंनी पाठिंबा दिला.

संतोष वाडेकर म्हणाले की, कुकडी व हिरडगाव साईकृपा या दोन्ही कारखान्याने श्रीगोंदा तालुका व परिसरातील अनेक शेतकर्‍यांचे कोट्यावधी रुपये थकवले आहेत. पुणे साखर आयुक्तांनी दि.17 मे 2019 रोजी कुकडी सहकारी साखर कारखाना व दि.15 जुलै 2019 रोजी साईकृपा हिरडगाव यावर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे.

मात्र अजूनही अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. पाचपुते यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलनाचा नऊवा दिवस असून कोणत्याही अधिकार्‍याने याची दखल घेतलेली नाही.

पाचपुते हे सत्ताधारी पक्षाचे असल्याने मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे ही कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तातडीने दोन्ही कारखान्यांचा लिलाव करुन ऊस उत्पादक शेतकरी, वाहतुकदार, कामगारांना त्यांच्या हक्काचे पैसे न मिळाल्यास भूमीपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment