Maharashtra News : राज्यातील निरनिराळ्या कारागृहांमधील उद्योगांमध्ये कार्यरत असलेल्या कैद्यांची पगारवाढ करण्यात आली असून, येत्या महिन्यापासून त्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू केली जाणार आहे. त्याचा लाभ सुमारे सात हजार कैद्यांना होणार आहे.
बहुतेक खासगी उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी ठरावीक कालावधीनंतर महागाई लक्षात घेता पगारवाढ होत असते. त्या धर्तीवर कारागृहातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कैद्यांना पगारवाढ देण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही काळापासून सातत्याने केली जात होती.
![Maharashtra News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/08/ahmednagarlive24-राज्यातील-कैद्यांना-पगारवाढ.jpg)
त्याबाबत सर्वांगीण अभ्यास करून कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी ही पगारवाढ लागू केली. त्याबाबतचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत.
नव्या वेतनश्रेणीनुसार कुशल कैद्यांना दैनंदिन ७४ रुपये, अर्धकुशल कैद्यांना ६७ रुपये, अकुशल कैद्यांना ५३ रुपये आणि खुल्या वसाहतीतील कैद्यांना ९४ रुपये दैनंदिन वेतन दिले जाईल. राज्यातील सर्व कारागृहांमध्ये विविध प्रकारच्या उद्योगांमध्ये दैनंदिनपणे सरासरी ७००० कैदी काम करतात. त्यामध्ये ६३०० पुरुष व ३०० महिलांना मिळून एकंदर ७००० कैद्यांना नव्या रचनेनुसार वेतन दिले जाईल.
राज्यातील विविध कारागृहांमध्ये सुतारकाम, लोहारकाम, शिवणकाम, चर्मकला, हातमाग, यंत्रमाग, बेकरी, कागदकाम, फाऊंड्री, कार वॉशिंग सेंटर, इस्त्री काम, गॅरेज, उपाहारगृहे, जॉब वर्क-लॉक सेट मेकिंग व वायर हार्नेस, मूर्तिकाम आदी स्वरूपाचे उद्योग चालवले जातात.
त्या माध्यमातून बेडशीट्स, होजिअरी वस्तू, कार्पेट्स, टॉवेल, चादर, कैदी युनिफॉर्म, चेअर मॅट्स, नॅपकिन, कपाटे, खुर्च्या, बुकशेल्फ, स्टील फोल्डिंग कॉट्स, बॉक्सेस, बॅरिकेड्स, विविध विभागांचे, शाळा-कॉलेजचे युनिफॉर्म, राज्यातील शासकीय वसतिगृहाचे सर्व साहित्य,
बूट्स, चप्पल, बेल्ट्स, बुक बायडिंग, वह्या, साबण, फिनेल, डिटर्जंट पावडर, सर्व प्रकारची भांडी, शालेय साहित्य, मेणबत्ती, अगरबत्ती तयार केली जाते. खुल्या कारागृहामध्ये कारागृह विभागाकडून शेती तसेच शेतीला पूरक व्यवसाय करण्यात आलेले आहेत. त्यामुळे कैद्यांना सतत काम उपलब्ध राहते. त्यातून कैद्यांना आर्थिक मोबदला मिळतो.