‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी वाहनचालकांची लूट !

Published on -

संगमनेर :- वरिष्ठांकडून दिलेले पावत्यांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी संगमनेरमधून जाणाऱ्या नाशिक-पुणे मार्गावर वाहनचालकांची लूट सुरू आहे.

ही लुटमार करणारे कोणी गुंड नव्हेत, तर ज्यांच्यावर या मार्गाची जबाबदारी सोपवली आहे, असे महामार्ग आणि जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस आहेत.

हिवरगाव पावसा टोलनाक्यावर दोन्ही दिशेने पोलिसांचे हे वसुलीनाके सुरू असून येथून जाणाऱ्या सर्वसामान्य वाहनचालकांना त्यांचा सामना करताना आर्थिक भुर्दंड बसत आहे.

नाशिक-पुणे मार्गावर दररोज हजारो वाहनांची ये-जा असते. त्यामुळे अपघातांचे प्रमाणदेखील मोठे आहे. अपघातग्रस्तांना मदत मिळावी यासाठी या मार्गावर चंदनापुरी घाटात महामार्ग पोलिसांचे कार्यालय आहे.

कऱ्हे घाट ते आळे खिंड आणि निमगाव जाळी ते शेंडी (भंडारदरा) असे त्यांचे कार्यक्षेत्र आहे. याशिवाय संगमनेर शहरातील वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन पोलिस अधीक्षकांनी जिल्हा वाहतूक शाखा काही दिवसांपूर्वी कार्यान्वित केली.

घुलेवाडी येथे या शाखेचे कार्यालय सुरू आहे. मात्र, आता या शाखेची ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी स्थिती आहे. सकाळी तास-दोन तासांसाठी काही ठरावीक वेळ कार्यालय सुरू असते. एरवी ते बंदच असते.

अधिकाऱ्यांसह वाहतूक पोलिस सरकारी वाहनातून नाशिक-पुणे आणि कोल्हार-घोटी मार्गावर निघून जातात. संगमनेरसाठी स्वतंत्र वाहतूक शाखा देऊनही येथील वाहतुकीची समस्या ‘जैसे थे’च आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe