अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत मला ज्या उमेदवाराने पाडले त्या उमेदवाराचाच आता लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करण्याची वेळ आली आहे. हे आता जिवावर आले आहे.
मात्र, मी आघाडीचा धर्म पाळणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे काहीही झाले तरी आघाडीचा उमेदवार नगरमधून प्रचंड मतांनी निवडून आणणार आहे, अशा शब्दांत सत्यजित तांबे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युवक पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी केशवचंद यादव, धीरज शर्मा, प्रवीण गायकवाड, चित्रलेखा पाटील तसेच पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नगरमधील आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्याबाबत तांबे बोलत होते.
२०१४ साली सत्यजित तांबे यांनी संग्राम जगताप यांच्या विरोधात अहमदनगरमध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती.
या निवडणुकीत जगताप यांच्याकडून तांबे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.
या बैठकीत त्यांनी व्यक्त केलेल्या वक्तव्यांवरुन 2014साली झालेला पराभव अजूनही त्यांच्या किती जिव्हारी लागला असल्याचे दिसून आले.
यावेळी तांबे म्हणाले, देशभरात निवडणुकीच्या तयारीला सुरवात झाली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील नगरच्या जागेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
या नगरमध्ये आघाडीची ताकद मोठ्या प्रमाणावर असल्याने यंदाच्या निवडणुकीत आघाडीचे उमदेवार निवडून जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.