सिरमची कोरोना लस सुरक्षित, आगीमुळे लस उत्पादनाला फटका नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-सिरमची कोरोना लस सुरक्षित आहे. कोव्हिशिल्ड लस उत्पादनाला फटका नाही. आग प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.

सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागलेल्या आगीची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दुर्घटनेबाबतची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. तसेच सिरम इन्स्टिट्यूटच्या टीमशी त्यांनी संवाद साधला. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील,

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खा. गिरीश बापट, आ. चेतन तुपे, सिरमचे अदर पूनावाला, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, मुख्यमंत्री यांचे प्रमुख सल्लागार अजोय मेहता, आरोग्य सल्लागार डॉ.दीपक म्हैसेकर, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार,

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, संपूर्ण जगात कोविडचे संकट अद्याप संपलेले नाही. गेल्या आठवड्यात सिरमच्या लसीमुळे आशेचा किरण निर्माण झाला. लस बनवणाऱ्या केंद्रात आग लागली ही बातमी आली.

दुर्दैवाने या दुर्घटनेत पाच कामगार मृत्युमुखी पडले. लस बनवली जाते ते केंद्र, साठा संपूर्णपणे सुरक्षित आहे. काल आगीचे वृत्त समजताच तातडीने संपर्क करून याबाबतची माहिती घेतली. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या इमारतीमधील पहिले दोन मजले वापरात आहेत, वरील दोन मजले जिथे नवे केंद्र सुरू केले जाणार होते, त्या ठिकाणी ही दुर्घटना घडली.

मात्र, सिरमची कोरोना लस सुरक्षित आहे. कोव्हिशिल्ड लस उत्पादनाला फटका नाही. आग प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी पूर्ण होऊन अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल. मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाची जबाबदारी सिरम कंपनीने घेतली आहे.

त्याशिवाय काही आवश्यकता असेल तर शासन निश्चित मदत करेल, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले. सिरमचे अदर पुनावाला म्हणाले, कोरोना लसीच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम नाही. बीसीजी आणि इतर लसीचे नुकसान झाले आहे. कोव्हिशिल्ड लसीचा पुरवठा सुरळीत असून लसीवर परिणाम नाही, मात्र आर्थिक नुकसान मोठे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment