अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी आम्ही अनेकांचे उंबरे झिजवले, पण यश आले नाही. आता २६ जानेवारीपर्यंत श्रीरामपूर जिल्हा झाला नाही, तर हुतात्मा होण्याची माझी तयारी आहे, असे श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी सांगितले.
लांडगे म्हणाले, श्रीरामपूर जिल्हा व्हावा म्हणून मागील अनेक वर्षांपासून कृती समितीचे अध्यक्ष प्रताप भोसले यांच्या नेतृत्वाखाली विविध मार्गाने प्रयत्न सुरू आहेत. मुख्यालयाचे शासकीय निकष श्रीरामपूर पूर्ण करू शकते.
प्रशासकीय इमारतींसाठी येथे शासकीय जमीन आहे, जिल्हा न्यायालय, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक, प्रांताधिकारी, परिवहन आदी महत्त्वाची कार्यालये श्रीरामपुरात आहेत. असे असतानाही शासनाकडून टोलवाटोलवी केली जात आहे.
येत्या २६ ला शासनाने नगर जिल्हा विभाजन करून श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा केली नाही, तर आपण हौतात्म्य पत्करू, असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. मनोज आगे म्हणाले, जिल्हा विभाजनाचा प्रश्न शरद पवारच सोडवू शकतात.
श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने व्हीआयपी गेस्ट हाऊस येथे लांडगे पत्रकारांशी बोलत होते. या वेळी कार्याध्यक्ष बाबासाहेब औताडे, पृथ्वीराज चव्हाण, चंद्रकांत परदेशी, नानासाहेब तुपे, सुदाम औताडे, सुरेश ताके,
भावेश ठक्कर, शिवाजी शेजूळ, सोमनाथ परदेशी, भरत आसने, विजय शिंदे, सुनील शेळके, मुकेश गोहील, अनिल भनगडे, वसंतराव शेटे, राजेंद्र कासलीवाल, गोरख साळुंके, कुणाल करंडे आदी उपस्थित होते.