शरद पवारांनी ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’त सामील व्हावे

Ahmednagarlive24
Published:
पाटणा : महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून राजकारणाचा फड चांगलाच रंगला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रातील सत्तारूढ ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’त (रालोआ) सामील व्हावे, अशी विनंती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी केली आहे.

पवार रालोआत आल्यास त्यांना महत्त्वाचे पद दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय वळण देण्यासाठी शिवसेना जबाबदार असून भाजपाने सेनेला चांगलाच धडा शिकविल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते अजित पवार यांचा पाठिंबा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर, बिहारची राजधानी पाटणा येथे पत्रकारांशी बोलताना रिपाइं (आ) गटाचे अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले की, शरद पवार यांनी त्यांचे बंडखोर पुतणे अजित पवार यांचे समर्थन करावे.

या सोबतच शरद पवारांनी स्वत:ची भूमिका बदलावी व रालोआत प्रवेश करावा. असे झाल्यास त्यांना केंद्रात मोठे पद मिळेल. त्यांच्या सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांनासुद्धा कॅबिनेट मंत्री बनविले जाईल, असे आठवले यांनी सांगितले.
गृहमंत्री अमित शहा यांनी अगोदरच सांगितले की महाराष्ट्रात सर्वकाही ठिक होईल. आता प्रत्यक्षात सर्वकाही ठिक झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. भाजपाच्या नव्या खेळीमुळे शिवसेना सत्तेपासून दूर राहिली आहे. या माध्यमातून भाजपाने सेनेला मोठा दणका दिला असून, राष्ट्रवादीला सत्तेत अडकवले आहे, असा टोलासुद्धा रामदास आठवले यांनी लगावला आहे. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रामदास आठवले पाटण्यात आले होते.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment