Pune News:- पुणे शहर हे वेगाने विकसित होत असलेले शहर आहे व त्यामुळे या ठिकाणी प्रचंड प्रमाणात आपल्याला वाहनांची व प्रवाशांची रेलचेल दिसून येते. यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस तसेच मेट्रो सारख्या इतर वाहतुकीच्या साधनांचा मोठ्या प्रमाणावर प्रवाशांना फायदा होताना आपल्याला दिसतो.
पुण्यामध्ये काही मार्गांवर मेट्रो सेवा सुरू झाल्यामुळे नक्कीच प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे. तसेच काही प्रस्तावित मेट्रो मार्गांचे काम अजून सुरू आहे. तसेच काही उड्डाणपुले व रिंग रोड सारखे मोठे प्रकल्प देखील पुण्यात सुरू आहेत. या सगळ्यांमुळे नक्कीच वेगवान प्रवास आणि वाहतूकीच्या समस्येपासून पुणेकरांना दिलासा मिळणार आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण पुणे येथील महत्त्वाचे असलेल्या शिवाजीनगर बस स्थानकाचा विचार केला तर या बसस्थानकाचे देखील आता रूपडे पालटणार असून लवकरच या बसस्थानकामध्ये सर्व सोयी सुविधा उभारल्या जाणार आहेत. कारण या ठिकाणी आता मल्टी मॉडेल हब बहुद्देशीय वाहतूक केंद्र बनवण्यात येणार आहे
व याकरिता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि महामेट्रो यांच्यामध्ये लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे केंद्र पीपीपी तत्त्वानुसार म्हणजे सार्वजनिक, खाजगी आणि भागीदारी तत्त्वानुसार हे बनवण्यात येणार आहे.
गेल्या चार वर्षापासून रखडले होते या बहुद्देशीय वाहतूक केंद्राचे काम
गेल्या तीन ते चार वर्षापासून शिवाजीनगर येथील बहुउद्देशीय वाहतूक केंद्राचे काम रखडले होते. त्यामुळे या कामाला पुन्हा गती मिळावी म्हणून आमदार सिद्धार्थ शिरोडे यांनी या प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती
व त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी शिवाजीनगर येथील मेट्रोच्या स्थानकाबद्दल आणि शिवाजीनगर एसटी महामंडळाच्या बस स्थानका संदर्भातल्या कामकाजाच्या अनुषंगाने एक आढावा बैठक घेतली व यावेळी अजित पवार यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी संपर्क साधला
व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि महा मेट्रो यांच्याकडे संयुक्त विकासासाठी सामंजस्य करार करण्यासंदर्भात संपर्क साधून चर्चा केली. इतकेच नाही तर सचिवांना देखील ताबडतोब या कामासंदर्भात करार करून निविदा प्रक्रिया राबवून काम सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
प्रवाशांना मिळणार सोयीसुविधा
शिवाजीनगर येथील बहुउद्देशीय वाहतूक केंद्राकरिता महामेट्रो आणि एसटी महामंडळात सोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे व त्यानुसार आराखडा तयार करण्यात येईल व त्या आराखड्यानुसार प्रवाशांना आवश्यक सोयी सुविधा मिळाव्यात या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून त्या सगळ्या बाबींचा समावेश या आराखड्यात करण्यात येणार आहे.
इतकेच नाही तर वातानुकूलित प्रतीक्षा कक्ष तसेच प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था व प्रवाशांना इतर वस्तूंची खरेदी करता यावी यासाठीचे केंद्र इत्यादी सुविधांचा लाभ प्रवाशांना या माध्यमातून मिळणार आहे.
राज्यामध्ये जेव्हा महाविकास आघाडी सरकार होते तेव्हा या स्थानकाच्या ठिकाणी बहुद्देशीय केंद्र बाबतचे निर्णय बऱ्याचदा बदलण्यात आले व त्यामुळे महामेट्रो आणि एसटी महामंडळाच्या स्थानकात या सर्व सोयी सुविधांचा आराखडा बनवताना महामेट्रो आणि महामंडळ यांच्यामध्ये एकवाक्यता होत नव्हती व त्यामुळे हे काम रखडले होते. परंतु आता यामुळे या कामाला गती येईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे.