अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- तेल, साबण यांसारख्या दैनंदिन जीवनात उपयोगात येणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या हिंदुस्तान युनिलीव्हर लिमिटेड (एचयूएल)ने आपल्या त्वचा स्वच्छतेच्या उत्पादनांच्या किमतीत २.५ टक्क्यांनी वाढ केली आहे, असे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
उत्पादन करताना वाढलेल्या खर्चामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे. डिसेंबर २०२० च्या तिमाहीत कंपनीच्या त्वचा स्वच्छतेसंबंधीच्या उत्पादनांमध्ये ही २.५ टक्क्यांनी वाढ झाली होती.

आता दुसऱ्यांदा ही वाढ करावी लागत असल्याचे एचयूएलचे मुख्य वित्तीय अधिकारी श्रीनिवास फाटक यांनी सांगितले. मात्र यामुळे सर्वसामान्यांच्या वापराचे साबण आणि तेल महागणार आहे.
श्रीनिवास पाठक या दरवाढीनंतर माध्यमांशी बोलत होते, तेव्हा त्यांनी पुढे सांगितले की, एचयूएल ही कंपनी त्वचा स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या साबण किंवा तेल यांसारखी उत्पादने उत्पादित करणाऱ्यांमध्ये अग्रणी असलेली कंपनी आहे.
या विभागात लक्स आणि लाइफबॉय सारखे लोकप्रिय ब्रँड आहेत. उत्पादनाच्या खर्चात सुमारे ७ ते ९ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र कंपनी केवळ ५ टक्के इतकीच वाढ करीत आहे.
ही वाढ दोन टप्प्यांत करण्यात आली आहे. डिसेंबर तिमाहित २.५ टक्के, तर आता आणखी २.५ टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. सध्या महागाई पराकोटीची वाढली आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved