MSRTC News : महाराष्ट्रातील एसटी डेपो होणार चकाचक

Sonali Shelar
Published:
MSRTC News

MSRTC News : १४ जून २०२३ रोजी एसटीच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनी प्रवाशांचा एसटी प्रवास सुखकर होण्यासाठी तसेच प्रवाशांना खड्डे, धुळीचा त्रास टाळण्यासाठी एसटी आगार, स्थानक ठिकाणी तत्काळ काँक्रीटीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिल्या.

मात्र पावसाळ्याचे दिवस असल्याने कामाच्या सुरुवातीलाच ब्रेक लागला. मात्र पावसाळा सरताच गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील १९३ आगारांतील रस्ते काँक्रीटीकरण करण्याच्या कामाला वेग आला आहे.

रत्नागिरी आगारातून काँक्रीटीकरण कामाला सुरुवात झाली असून येत्या दोन महिन्यांत राज्यातील सर्व आगार खड्डेमुक्त होत एसटी बसेस काँक्रीट रस्त्यांवरून धावताना दिसणार असल्याची माहिती एसटीच्या स्थापत्य विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात प्रवाशांची खड्ड्यांमधून सुटका होणार आहे.

सर्वसामान्य प्रवासी आजही एसटी प्रवासाला सर्वाधिक प्राधान्य देतात. मात्र एसटी आगारातील विविध सुविधांबाबत प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक त्रासदायक ठरत आहेत ते आगारातील खड्डेमय रस्ते.

हीच बाब लक्षात घेत १४ जून २०२३ रोजी एसटीच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रवाशांचा एसटी प्रवास सुखकर होण्यासाठी तसेच प्रवाशांना खड्डे, धुळीचा त्रास टाळण्यासाठी एसटी आगार, स्थानक ठिकाणी तत्काळ काँक्रीटीकरण करण्याच्या सूचना एसटी महामंडळाला दिल्या.

या बस स्थानकांचा कायापालट करण्यात एमआयडीसीने योगदान द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी वर्धापन दिनी केले होते. त्यानुसार एमआयडीसी विभागातून ५०० कोटी यासाठी देण्यात आले आहेत.

सध्या राज्यातील बहुतांश आगारांत काँक्रीटीकरण काम पूर्ण झाले आहे. रत्नागिरी आगारातून कामाला सुरुवात झाली. येत्या दोन महिन्यांत काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण होईल.

एमआयडीसीकडून आणखी १०० कोटी प्रस्तावित आहेत. मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी मिळताच त्या निधीतून काँक्रीटीकरण झालेल्या आगारांची रंगरंगोटी, दुरुस्ती केली जाणार आहे.– विद्या भिल्लारकर, मुख्य स्थापत्य अभियंता, एसटी महामंडळ

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe