अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नेवासे :- ऊस वाहतुकीच्या रिकाम्या ट्रॅक्टर-ट्रॉलीखाली सापडून सतरा वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी नेवासे-शेवगाव रस्त्यावर कुकाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर घडली. या अपघातानंतर संतप्त झालेल्या कुकाणे व तरवडी ग्रामस्थांनी तरवडी चौकात सार्वजनिक बांधकाम व उपप्रादेशिक परिवहन विभागाविरोधात एक तास रास्ता रोको आंदोलन केले.
रोहित अशोक पुंड (तरवडी, ता. नेवासे) असे या अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. शेवगावच्या दिशेने एकामागे एक असे दोन ऊसवाहतूक करणारे रिकामे ट्रॅक्टर-ट्रॉली जात होते. रोहित मागच्या ट्रॅक्टरखाली सापडल्याने त्याचा मृत्यू झाला.

ही घटना घडताच कुकाणे, तरवडी येथील संतप्त ग्रामस्थांनी डबल ट्रॅक्टर-ट्रॉली ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आरडीओने कारवाई करून अशी वाहतूक तत्काळ बंद करावी, अशी मागणी केली. रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वारंवार होणाऱ्या अपघातप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी करत नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.
जोपर्यंत उपप्रादेशिक परिवहन व सार्वजनिक बांधकामचे अधिकारी आंदोलनस्थळी येत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार ग्रामस्थांनी केल्याने काही काळ येथील तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, तहसीलदार रुपेश सुराणा व पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे यांच्या मध्यस्थी नंतर व तहसीलदार सुराणा यांनी संबंधित विभागाला पुन्हा सूचना देण्याच्या व डबल ट्रॅक्टर-ट्रॉली उसवाहतुकीविरोधात परिवहन विभागाला, तर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तातडीने कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
Web Title – Student dies after crushing under a tractor trolley