अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर :- अनुराधा सचिन उमाप (वय १८, श्रीरामपूर) हिने सासरच्या छळाला कंटाळून शनिवारी पहाटे आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद आईने दिली.
याबाबत मृत अनुराधाची आई बायजाबाई अनिल शिंदे (औरंगाबाद) यांनी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात शनिवारी फिर्याद दिली. त्यात त्यांनी म्हटले आहे,
अनुराधाचा विवाह ११ जुलै २०१९ रोजी श्रीरामपूर येथील सचिन भगवान उमाप यांच्याशी झाला होता. लग्नानंतर एक महिन्यापासून वेळोवेळी मुलगी अनुराधा सासरी नांदत असताना
नवरा सचिन भगवान उमाप, सासरा भगवान भीमराव उमाप, सासू माया भगवान उमाप (सर्व रा. सिद्धार्थनगर श्रीरामपूर) यांनी संगनमत करून ‘मुलीस लग्नात हुंडा दिला नाही, तू माहेरून हुंडा म्हणून ५० हजार रुपये घेऊन ये’ या कारणावरून तिला नेहमी मानसिक व शारीरिक त्रास दिला.
त्यांच्या त्रासास कंटाळून अनुराधा हिने राहत्या घरात शनिवारी पहाटे ४ वाजता ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संभाजी पाटील करीत आहेत.