अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पाथर्डी सहकार खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, याचा विसर पडू देऊ नका. आपलीच विचारसरणी लोकांनी अंमलात आणावी असा दुराग्रह धरल्यानेच घरी बसण्याची वेळ आली. कर्मचाऱ्यांवर सूडबुद्धीने कारवाई करणार असाल, तर आमचीसुद्धा बँकेत सत्ता आहे. आमचा संयम ढळला, तर आम्हीसुद्धा तसे उत्तर देऊ शकतो. संयमाचा अंत पाहू नका, अशा शब्दांत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता त्यांना निर्वाणीचा इशारा दिला.
तिसगाव येथे आयोजित कार्यक्रमात मंत्री तनपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते काशिनाथ लवांडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती संभाजी पालवे, मोहन पालवे, अनिल वाळके महाराज, शिवशंकर राजळे, दत्तात्रय मरकड, संभाजी वाघ, अरूण आठरे, इलियास शेख, चंद्रकांत म्हस्के, राजेंद्र म्हस्के, बाबासाहेब बुंधवत, अनिल राधवने आदी उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीत विरोधकांचे काम केले, असा आरोप करत कर्डिले यांनी काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. यावरून राजकीय हवा तापली. तिसगाव परिसरावर कर्डिले यांचा पूर्वी प्रभाव होता, म्हणून मंत्री तनपुरे यांनी त्यांना निर्वाणीचा इशारा देण्यासाठी पाथर्डी तालुक्याची निवड केली.
वृद्धेश्वर हायस्कूल चौकापासून वाजत-गाजत तनपुरे यांची मिरवणूक काढण्यात आली. महाविकास आघाडीचा कार्यक्रम असला, तरी या कार्यक्रमात कर्डिले, आमदार मोनिका राजळे व खासदार डॉ. सुजय विखे या भाजप नेत्यांचे काही कार्यकर्तेसुद्धा सहभागी झाले. विविध वक्त्यांनी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तिसगाव पाणी प्रश्न व जलसंधारणाच्या अपूर्ण कामाकडे लक्ष दिले
तनपुरे म्हणाले, तिसगाव पाणी योजनेच्या कामाला अग्रक्रम देऊन प्रसंगी एक्सप्रेस लाईन म्हणजे मुळा धरणापासून तिसगावपर्यंत थेट हेडलाईन टाकून पाणीप्रश्न सोडवण्याचा गांभीर्याने विचार करू. वांबोरी चारीसाठी पाण्याच्या उपलब्धतेवर तांत्रिक बंधने आहेत. मराठवाड्याला गोदावरीचे पाणी प्राधान्याने देण्याचे धोरण आहे. तरीही वांबोरी चारीचे पाण्यासंदर्भात जलवाहिनीचे दोष दुरुस्त करून पाणी देण्यावर भर राहील.