अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर :- माझ्या हातात इंटरनल मार्क आहेत असे सांगत १२ वी सायन्सच्या विद्यार्थिनीकडे शरीरसंबंधाची मागणी करण्याचा खळबळजनक प्रकार बेलापूर गावात उघड झाला. मात्र एवढे गंभीर प्रकरण असताना केवळ शिक्षकाचा माफीनामा घेवून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याने पालकांमध्ये तीव्र संताप आणि चीड व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, बेलापूर गावातील एका नामांकित कॉलेजला इयत्ता १२ वीला हा शिक्षक गणित विषय शिकवतो . सदर शिक्षकाने एका विद्यार्थिनीस माझ्या हातात १२ वी परीक्षेचे इंटरनल ( अंतर्गत ) मार्क आहेत ते तुला पाहिजे असतील तर तु माझ्याबरोबर शरीरसंबंध ठेव, अशी शिक्षकी पेशेला काळीमा फासणारी मागणी या नालायक शिक्षकाने या विद्यार्थिनीकडे केली.
१२ वी सायन्सला शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकांच्या या मागणीचा मोठा धक्का बसला . रविवारी कॉलेजला सुट्टी होती . तेव्हा दुपारी ही मुलगी घरी रडत होती . सदर मुलीची आई दवाखान्यात नोकरीला असल्याचे समजते . आपली मुलगी का रडत आहे म्हणून आईने या मुलीला आपल्याजवळ घेतले आणि तिला विश्वासात घेवून नेमके काय झाले ? तू का रडते ? असे विचारले असता सदर मुलीने आपल्या गणिताच्या शिक्षकाने आपणाकडे शरीरसुखाची मागणी केल्याचे आईला सांगितले.
हे ऐकून आईलाही मोठा मानसिक धक्का बसला . आता नेमके काय करावे ? असा प्रश्न या माऊलीला पडला . त्यांनी आपल्या भावाला ही गोष्ट सांगितली . मुलीच्या मामाचे गावात काही सामाजिक कार्यकत्यांशी संबंध होते . त्यांनी तातडीने त्यांना फोन करुन ही हकीगत सांगितली. तेव्हा त्यांनाही धक्का बसला. सदर प्रकार संस्था चालकांपैकी तिघांना सांगण्यात आला. त्यात बेलापूरचे दोन माजी सरपंच आहेत. सदर प्रकार ऐकून त्यांनाही धक्का बसला.
त्यानंतर सदर मुलीला प्राचार्यानी बोलावून घेतले . मुलीने आपल्याबरोबर घडलेला प्रकार प्राचार्यासमोर जसाच्या तसा सांगितला,त्यानंतर सदर शिक्षकाला त्या ठिकाणी बोलाविण्यात आले . मात्र सदर शिक्षकाने पहिले हात वर केले. आपणावर खोटा आरोप करत असल्याचे तो म्हणाला. मात्र त्याचे पूर्वीचे काही प्रताप माहीत असल्याने त्याला काहींनी प्रश्न विचारले त्यानंतर संस्था चालकांपेकी उपस्थित असणाऱ्या तिघांनी सदर शिक्षकाला धारेवर धरले. त्यानंतर मात्र सदर शिक्षकाने आपली चूक झाल्याचे सर्वासमोर मान्य केले.
मात्र सदर शिक्षकाने नंतर गयावाया केल्यानंतर त्याच्याकडून माफीनामा लिहून घेतल्याचे समजते . या प्रकारानंतर हा शिक्षक प्राचार्याबरोबर पुन्हा सदर मुलीच्या घरी गेला व त्याने मुलीचे व आईचे पाय धरल्याचे समजते . संस्था चालकाने कॉलेजची आणि गावाच्या नावाची चर्चा होऊ नये म्हणून सदर प्रकरणावर पडदा टाकला असे सांगण्यात येते. मात्र एवढा मोठा गंभीर प्रकार घडूनही शिक्षक आपल्या ठिकाणी कायम राहिल्याने सदर मुलगी आणि इतर मुलींवरही त्याची दहशत कायम राहण्याची भीती आहे.
कारण सदर शिक्षकाच्याच हातात इंटरनल मार्क राहणार असल्याने आणि एवढी मोठी घटना होवूनही शिक्षकावर काहीच कारवाई झाली नाही हा संदेश विद्यार्थी व पालकात यामुळे जाणार आहे . परिणामी अशाप्रकारे शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे कृत्य करणाऱ्याविरोधात कुणी आवाज उठवायला धजवायचे नाही.
Web Title – teacher-demands-sex-for-12th-science-student