मोठी बातमी : कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आलेल्या देशातून अहमदनगरमध्ये ११ जण आले..

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-इंग्लंड देशात कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकूण 1000 रुग्णांना नव्या कोरोना विषाणूची लागण झाली आहे.दरम्यान, या विषाणूचा संसर्ग वाढत जरी असला, तरी हा विषाणू आधीच्या कोरोना विषाणूच्या तुलनेत कमी संहारक आहे. तशी माहिती ब्रिटिश वैज्ञानिकांनी दिली आहे.

त्या सर्वांची होणार कोरोना चाचणी : इंग्लंडमध्ये आढळलेल्या नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर नगर शहरात विविध ठिकाणी इंग्लंडहून ११ जण आल्याची माहिती समोर आली आहे. पाच वेगवेगळ्या कुटुंबातील या व्यक्ती असून, त्यांची कोरोना चाचणी होणार आहे.

इंग्लडहून नगरला आलेल्यांमध्ये मार्केटयार्डमधील ०२, कराचीवालानगरमधील ०४, गुलमोहोर रोडवरील ०३, पाईपलाईनरोड व नवनागापूर येथील प्रत्येकी एक, अशा एकूण ११ जणांचा यात समावेश आहे. नगरमधील हे प्रवासी ०७, ०९, १२, १४, २१ आणि २२ डिसेंबरला आली आहेत.

या सर्व नागरिकांची महापालिकेतर्फे कोरोना आरटीपीआर चाचणी होणार आहे. या चाचणीमध्ये बाधित आढळलेल्या रुग्णांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी एऩआयव्ही पुणे येथे पाठविणार आहे या तपासणीत जे प्रवासी निगेटिव्ह आढळतील त्यांचा पाठपुरावा पुढील २८ दिवस करता होईल. या प्रवाशांच्या सहवासितील लोकांचा शोध घेऊन सर्वांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

नव्या विषाणूवर अभ्यास करणे सुरु : ब्रिटिश वैज्ञानिकांनी या नव्या कोरोना विषाणूबद्दल यापूर्वीच माहिती दिली होती. इंग्लंडचे आरोग्यमंत्री मॅट हॅटकॉक यांनी नव्या विषाणूबद्दल अधिक माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे या देशात 60 वेगवेगळ्या ठिकाणी नव्या कोरोना विषाणूचे संक्रमण झालेले रुग्ण आढळले आहेत. ब्रिटिश सरकारने या नव्या कोरोना विषाणूबद्दल जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) कळवलं आहे.तसेच, ब्रिटिश वैज्ञानिकही या विषाणूवर अभ्यास करत असल्याचे हॅटकॉक यांनी सांगितलं.

वैज्ञानिक म्हणतात घाबरू नका : यावेळी हॅटकॉक यांनी या विषाणूबद्दल अधिकची माहिती देताना नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन केले आहे. तसेच, हा विषाणू पहिल्या विषाणूच्या तुलनेक कमी धोकादायक असल्याचे सांगत नागरिकांनी घाबरुन जाण्यापेक्षा योग्य खबरदारी घेण्याचंही त्यांनी सांगितलं. दक्षिण इंग्लंडमध्ये नव्या कोरोना विषाणूचा आतापर्यंत 1000 जणांना संसर्ग झाला आहे. या भागातील स्थानिक प्रशासनाने ही आकडेवारी दिली आहे.

नव्या कोरोना विषाणूच्या प्रोटीनमध्ये वाढ : -इंग्लंडचे मुख्य आरोग्य अधिकारी प्रोफेसर क्रिस विटी यांनीदेखील या विषाणूबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.त्यांनी सांगितल्याप्रमाणे या नव्या कोरोना विषाणूमध्ये प्रोटीनची वाढ झालेली आहे. विषाणूतील प्रोटीन वाढल्यामुळे हा विषाणू शरीरावर गंभीर परिणाम करु शकतो. सध्यातरी नव्या कोरोना विषाणूबद्दल जास्त काही सांगणे योग्य नाही, असेही प्रोफेसर विटी यांनी सांगितले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment