अहमदनगर : जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातून विधानसभा सदस्य निवडणूक निवडण्याची प्रक्रिया भारत निवडणूक आयोगामार्फत नुकतीच संपन्न झाली. हे बारा आमदार निवडण्यासाठी जिल्ह्यापुरता विचार करता आयोगाचे तब्बल २१ कोटी रुपये खर्ची पडले आहेत.
थोडक्यात एका आमदाराची निवड करण्याचे काम पावणेदोन कोटीला पडल्याचे निष्पन्न होत आहे. प्रजासत्ताक प्रणालीद्वारे देश आणि राज्याचा कारभार चालतो. संसदेचे आणि राज्य विधिमंडळाचे प्रतिनिधी निवडण्याचे काम भारत निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात येते.
ही अफाट प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडताना आयोग कोट्यावधी रुपयांचा खर्च करतो. नुकतीच विधानसभेची निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. नगर जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ आहेत.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोगाच्या दिशानिर्देशात बारा मतदार संघाचे १२ स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. तसेच आयएएस दर्जाचे निवडणूक निरीक्षक नियुक्त करण्यात आले.
निर्भय आणि निर्दोष वातावरणात निवडणूक प्रक्रिया संपन्न होण्यासाठी स्थिर नियंत्रण व भरारी आशा ७२ पथकांची नियुक्ती करण्यात आली. जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघकरिता एकूण ३ हजार ७२२ मतदान केंद्र होती. या मतदान केंद्रावर मतदान केंद्रनिहाय तब्बल सहा कर्मचारी नियुक्त होते.
निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या जिल्ह्यातील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या तब्बल २४ हजार ५३२ इतकी होती. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस, केंद्रीय सुरक्षा दल आणि होमगार्ड असा आठ हजार जणांचा फौजफाटा तैनात होता. याच बरोबर मतदार जागृतीचे अभियान आयोजित करण्यात आले होते.
निवडणुकीसाठी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांची मतदारसंघनिहाय प्रशिक्षण झाले. प्रत्यक्ष मतदानासाठी सखी मतदान केंद्र, आदर्श मतदान केंद्र देखील तयार करण्यात आली. बारा विधानसभा मतदारसंघातील ४१६ मतदान केंद्रांचे थेट वेब कास्टिंग करण्यात आले.
मतदान यंत्र, साहित्य आणि कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी १ हजार १६१ वाहने तैनात केली गेली. सुरक्षेच्या दृष्टीने या सर्व वाहनांना जीपीएस प्रणाली बसवण्यात आली होती. निवडणुकीपूर्वीच मतदान प्रक्रियेसाठी मतदान यंत्र जिल्ह्यात दाखल झाली होती.
वखार महामंडळाच्या गोदामात या मतदान यंत्रांच्या तपासणीचे काम प्रदीर्घ काळ चालले. यासाठीदेखील मनुष्यबळ तैनात होते. मतदार संघात आयोगाने निश्चित केलेल्या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया संपन्न झाली. २१ सप्टेंबर रोजी आचारसंहिता घोषित झाल्यानंतर २४ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील बारा आमदार महोदय यांची निवड झाली.
निवडणुकीची ही प्रक्रिया तब्बल ३४ दिवस सुरू राहिली. या निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे एकवीस कोटीचा निधी प्राप्त झाला. थोडक्यात एका आमदाराची निवड करण्यासाठी आयोगाचे सरासरी पावणे दोन कोटी रुपये खर्ची पडले आहेत.