इंजिनियर तरुणीचा खून ! दुसऱ्याच्या प्रेमात पडल्याच्या संशयातून प्रियकरानेच ५ गोळ्या झाडल्या

Ahmednagarlive24 office
Published:

पुणे तेथे काय उणे असे म्हटले जाते. पुणे हे विद्येचे माहेर आहे. परंतु या पुण्यातूनच आता काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येताना दिसत आहेत. नुकतीच हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या इंजिनिअर तरुणीचा गोळ्या घालून खून झाल्याची घटना घडली होती.

आता या घटनेचा उलगडा झाला असून तिच्या प्रियकरानेच हे हत्याकांड केले आहे. आपली प्रेयसी दुसऱ्याच्या प्रेमात पडल्याच्या संशयातून या इंजिनिअर तरुणीचा तिच्या प्रियकराने गोळ्या घालून खून केल्याची माहिती समजली आहे.

दरम्यान, प्रियकराने पाच गोळ्या झाडून तिचा खून केल्याचे मृत तरुणीच्या शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. तरुणीचा मृतदेह सोमवारी (२९ जानेवारी) सकाळी तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. वंदना द्विवेदी (२६) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी ऋषभ राजेश निगम (रा. लखनऊ) याला अटक करण्यात आली आहे. तो सध्या पोलिस कोठडीत आहे.

अधिक माहिती अशी : महाविद्यालयात असताना वंदना आणि ऋषभ हे एकमेकांवर प्रेम करू लागले. वंदनाने इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले असून ती हिंजवडी येथे इन्फोसिस कंपनीत नोकरी करत होती. ऋषभ हा लखनऊमध्ये ब्रोकरचे काम करत होता. दोघेही फोनवरून एकमेकांच्या संपर्कात होते. परंतु काही गोष्टींवरून ती अन्य कोणाच्या तरी प्रेमात पडल्याचा संशय त्याला आला. त्यामुळे त्याने हे कृत्य केले.

मागील ४ वर्षांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. ऋषभने ५ वर्षापूर्वीच एका मित्राकडून पिस्तुल घेऊन ठेवले होते. संशय वाढल्याने ऋषभ २५ जानेवारी रोजी लखनऊहून हिंजवडीत आला. वंदना २६ जानेवारी रोजी सायंकाळी लॉजमध्ये ऋषभ याला भेटली. भेटून ती पुन्हा आपल्या हॉस्टेलमध्ये परतली. ऋषभने दुसऱ्या दिवशी वंदनाला लॉजवर नेत तिची हत्या केली असल्याचे समोर आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe