Maharashtra News : मराठा आरक्षणासाठी लढत असलेले मनोज जरांगे-पाटील आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात आता शब्दयुद्ध पेटले आहे. जरांगे यांचा लढा मराठा तरुणांच्या हिताचा नव्हे, तर राजकारणासाठी आहे. म्हणूनच जरांगे हे आरक्षणाची मागणी रेटून धरत आहेत,
असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले. त्याला जरांगे – पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर देत, राज्याचा विरोधी पक्षनेता एखाद्या जातीचा द्वेष करणारा असतो का? असा जळजळीत सवाल विचारला आहे. मराठ्यांचे नुकसान करणाऱ्या सहा जणांची नावे येत्या २४ तारखेला जाहीर करणार असल्याची घोषणाही जरांगे यांनी यावेळी केली.
मराठा समाजास ओबीसींमधून आरक्षण द्यावे, अशी जरांगे-पाटील यांची मागणी असून, त्यास ओबीसी समाजातील नेत्यांचा तीव्र विरोध आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याशी जरांगे यांचा वाद झाला होता. आता काँग्रेसमधील ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी जरांगे यांच्यावर टीका करून या वादात तेल ओतले आहे.
त्याला प्रत्युत्तर देताना जरांगे-पाटील म्हणाले की, वडेट्टीवार यांच्यासारख्यांची विचारधारा ही मराठा समाजाविषयी विष पेरणारी आहे. अंतरवाली सराटी येथे येऊन याच वडेट्टीवार यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता.
आता ते वेगळे बोलत आहेत. ते सरड्यासारखे रंग बदलत आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी तुम्हाला असे करायला सांगितले आहे काय, असा सवालही जरांगे-पाटील यांनी केला.