Maharashtra News : पूर्वीचे यशवंतराव मुकणे महाराजांचे ऐतिहासिक संस्थान आणि उंच ठिकाणी वसलेल्या जव्हारची आजही ओळख आहे. तसेच महाराष्ट्रातील ‘मिनी महाबळेश्वर’ संबोधले जाणारे उंच हवेचे ठिकाण म्हणजे जव्हार हेच जव्हार पावसाळ्यात पर्यटकांना खुणावते आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून पर्यटकांची पावले आपोआप जव्हारकडे वळताना दिसत आहेत. दरवर्षी पर्यटकांना खुणावतात त्या हिरव्यागार डोंगर टेकड्या, मन मोहून टाकणारे दृश्य बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी दिसत आहे. जव्हार हे ऐतिहासिक संस्थान असल्याने येथे मुकणे राजांचा नवा राजवाडा जयविलास (पॅलेस) आणि जुना राजवाडा हे राजवाडे इतिहासाची साक्ष देत आहेत.
![Maharashtra News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/07/ahmednagarlive24-Maharashtra-News-10.jpg)
तसेच शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ‘शिरपामाळ’ येथून सूर्यास्ताचे मनमोहक दृश्य पहायला मिळते. सनसेट पॉइंट, हनुमान पॉइंट हे जव्हार शहरातील महत्त्वाचे पॉइंट आहेत. त्यानंतर वारली आदिवासींची संस्कृती जवळून पाहावयास मिळत आहे.
जव्हार हे उंच ठिकाण असल्याने येथे दाबोसा, हिरडपाडा काळमांडवी असे डोळ्यांचे पारणे फेडणारे नैसर्गिक धबधबे आहेत. राज्याची राजधानी मुंबई, ठाणे, नाशिक या महत्त्वाच्या मोठ्या शहरांना लागून असलेले जव्हार हे ऐतिहासिक संस्थान आहे.
जव्हार हा ग्रामीण भाग सह्याद्रीला संलग्न असलेल्या लहान मोठ्या हिरव्यागार डोंगर, टेकड्या, दऱ्याखोऱ्यांनी नटलेला परिसर आहे. जव्हार हे समुद्रसपाटीपासून सुमारे १७००० मीटरहून अधिक उंच आहे. जव्हारला लागूनच जवळपास मोखाडा, सूर्यमाळ, खोडाळा यासारखी लहान लहान हिल स्टेशन्स पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
पावसाळ्यात हा सारा परिसर हिरवागार व डोंगरातून कोसळणाऱ्या झऱ्यांनी व लहान मोठ्या धबधब्यांचा खळखळाट असतो. त्यात शनिवार, रविवारी शेकडो पर्यटक मनमोहक आनंद घेताना दिसत आहेत. जव्हार शहराच्या परिसरात निसर्गरम्य देखावा, वारली चित्रकला आदी गोष्टी पाहावयास मिळतात.
पावसाळ्यात दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये शाळकरी मुले-मुली तसेच पर्यटक आणि गिर्यारोहक येथे निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येतात. जव्हार या आदिवासी भागात तारपा वाद्य आणि नृत्य करणे ही आदिवासींची पारंपरिक संस्कृती आहे. तारपा वाद्याला या भागात महत्त्वाचे स्थान आहे. ही तारपा संस्कृती कायमस्वरूपी राहावी. म्हणून जव्हार शहरात तारपा चौक आहे. या ठिकाणी तारपा वाजवणारा पुतळा आहे.