अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ मुंबई : यावर्षीही प्रचंड गोंधळात सुरू झालेली आणि संपलेली इयत्ता ११ वीची ‘ऑनलाईन’ प्रवेश प्रक्रिया गैरव्यवहारांसाठीच करण्यात आली आणि त्यात कोट्यवधी रुपयांचा चुराडाही झाला आहे, असा आरोप पुणे येथील ‘सिस्कॉम’च्या ‘शिक्षण सुधारणा मोहीम’च्या संचालक व शिक्षण प्रमुख वैशाली बाफना यांनी केला आहे.
‘केपीएमजी’ या ख्यातनाम संस्थेने तयार केलेल्या लेखापरीक्षण अहवालामुळे याला पुष्टी मिळते, असाही त्यांचा दावा आहे.यंदाच्या इ. ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेवेळी पहिले काही दिवस झालेला तांत्रिक गोंधळ आणि त्यावर तत्काळ तोडगा काढून हजारो विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिलासा देण्याबद्दल मुंबई शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये कोणताही समन्वय नसल्याने प्रचंड गोंधळ उडाला.
हजारो विद्यार्थ्यांना त्याचा मानसिक आणि शारीरिक त्रास सोसावा लागला होता. राज्यातील अन्य ५ शिक्षण उपसंचालकाच्या कार्यालयांमध्येही यंदाही यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नव्हती, असे बाफना यांनी सांगितले.