उद्योगपतींचे गुलाम असणारे पंतप्रधान आता शेतकऱ्यांनाही उद्योगपतींचे गुलाम बनवू पाहत आहेत…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- केंद्रातील भाजपा सरकारने लोकशाही आणि संसदेचे नियम पायदळी तुडवून आणलेले कृषी कायदे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार आहेत. या कायद्यांच्या माध्यमातून बड्या उद्योगपतींचे गुलाम असणारे पंतप्रधान आता शेतकऱ्यांनाही उद्योगपतींचे गुलाम बनवू पाहत आहेत;

पण काँग्रेस पक्ष त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

कृषी कायदे रद्द करावेत आणि इंधनदरवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी शनिवारी (१६ जानेवारी) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्या नेतृत्वात शेकडो ट्रॅक्टरसह हजारो शेतकऱ्यांनी भव्य रॅली काढून नागपूर राजभवनाला घेराव घातला. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शेकडो महिलांनी रस्त्यावर चुली मांडून भाकरी भाजून केंद्र सरकारचा निषेध केला. थोरात यांनी केंद्र सरकारवर चौफेर हल्लाबोल केला.

ते म्हणाले, मोदींनी काळे कायदे आणून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा विडाच उचलला आहे. शेतकरी ५० दिवसांपासून ऊन, पाऊस, वारा, थंडीत आंदोलन करीत आहेत.

या कायद्यामुळे साठेबाजी, महागाई वाढणार असून उद्योगपतींना मोठ्या प्रमाणात नफेखोरीची मुभा मिळणार आहे. या तिन्ही कायद्यांमध्ये शेतकऱ्यांच्या फायद्याचे काही नाही; पण केंद्र सरकारला शेतकऱ्यांचे काही देणे-घेणे राहिलेले दिसत नाही.

उद्योगपतींचे हित डोळ्यांसमोर ठेवून हे कायदे बनविले आहेत. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांची थकित कर्जे माफ केली. अतिवृष्टी आणि वादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून १० हजार कोटींचे पॅकेज दिले.

आम्ही फक्त बोलत नाही तर शेतकऱ्यांना मदत करतो आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शेतकरीविरोधी केंद्र सरकारविरोधात संघर्षही करतो.

भाजपा सरकारच्या काळात कच्च्या तेलाचे दर प्रचंड घसरले असतानाही देशात दररोज इंधनाच्या किमती वाढवून केंद्र सरकार सर्वसामान्यांची लूट करीत आहे. केंद्र सरकार जोपयंर्त काळे कायदे व इंधन दरवाढ मागे घेत नाही, तोपयंर्त संघर्ष थांबविणार नाही, असा इशारा थोरात यांनी दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment