जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बनला गंभीर ! शेतकऱ्यांचे व दुग्ध व्यवसाय करणाऱ्याचे अर्थचक्र विस्कटले

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : चालू वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न हिवाळ्यातच भीषण झाला आहे. मागणी जास्त व पुरवठा कमी असल्याने चाऱ्याचे भाव गगनाला भिडल्याने, पर्यायी सोयाबीन भुसा, कडब्याची वैरण, मका, मुरघासाची कुट्टी याचे भाव दुपटीने वाढले आहेत.

शेतकऱ्यांचे व दुग्ध व्यवसाय करणाऱ्याचे अर्थचक्र विस्कटले असून, पशुधन जतन कसे करायचे? असा प्रश्न ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना भेडसावत आहे.यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने कोणतेही पीक हातात आले नाही.

ज्वारी, बाजरीसारखे कडबावर्गीय पिके संपूर्ण नष्ट झाली. सोयाबीन बहुतेक शेतकऱ्यांच्या पदरात पडले नाही. त्यामुळे त्यापासून तयार होणार भुसा उत्पादन झाले नाही. जे झाले त्याला सोन्याचे मोल मिळाले.

अल्पवधित शेतकरी व दुग्धव्यवसाय करणाऱ्यांसाठी 940 लोकप्रिय ठरलेला मका पिकाचा मुरघास या वर्षी चांगलाच भाव खाऊन गेला. मागील वर्षीपेक्षा मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने दुप्पट भाव वाढ झाली.

चार ते साडेचार हजार रुपये टन मुरघासाची विक्री झाली. त्यामुळे ऐन हिवाळ्यात हिरव्यागार चारा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना भटकंती करावी लागली. त्यात दुधाचे भाव ढासळल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. त्यासाठी आजमितीला विविध ठिकाणी जण आंदोलन, रास्तारोको करत शेतकरी रस्त्यांवर उतरला आहे.

ऊसाचा गोडवा वाढला..!

चाऱ्याची मोठ्या प्रमाणात टंचाई भासत असल्यामुळे उसाचे भावही गगनाला भिडले आहेत. १० ते १२ उसाची मोळी ५० ते ६० रुपयांपर्यंत गेली आहे. तरीही पर्याय नसल्याने उसाला चारा म्हणून मागणी वाढत आहे.

शिल्लक फक्त शेणखत..!

चारा महागल्यामुळे रोज विकत चारा घेऊन दूध व्यवसाय करणे जिकरीचे झाले आहे. दुधाचे भाव खूप पडल्याने खर्चही निघत नाही. तेव्हा उत्पन्न तर कोसो दूर पण दिवसभर जनावरांसाठी कष्ट करून हिशोब केला तर फक्त शेणखतच शिल्लक रहात आहे. – योगेश वाघ, तरुण शेतकरी

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe