मालेगावमध्ये कोरोनाने हाहाकार उडविला आहे. मालेगावात २४ तासांत कोरोनाचे ८२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत २७६ कोरोनाबाधित असून एकट्या मालेगावात २५३ कोरोनाग्रस्त आहे.
येथे ८०० पोलीस आणि एसआरपीएफ तुकडया तैनात करण्यात आल्या असूनही कोरोनाचा फैलाव आटोक्यात येताना दिसत नाही. काल आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथील परिस्थितीचा आढावा घेतला.

मालेगावात कम्युनिटी स्प्रेडचा धोका वाढला आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. येथे पोलीस सुरक्षेत अधिक वाढ करण्यात आली आहे. नागरिक ऐकत नसल्याने पोलीस कुमकही वाढविण्यात आली आहे.
मालेगावात सध्या आठशे पोलीस आहे. एसआरपीएफ तुकडया तैनात आहेत. आवश्यकता असल्यास अधिक पोलीस आम्ही पाठवू असं सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मालेगावात कुठल्याही परिस्थितीत कुमक कमी पडणार नाही, असे आश्वासन दिले आहे.
तर दुसरीकडे मालेगावात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या भागाला भेट दिली. तसेच काल नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा, सुव्यवस्था,सार्वजनिक आरोग्य व प्रशासकीय उपाययोजना यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तातडीने उपाय-योजना करण्याचे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांना देण्यात आले.













