अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- मनपाकडून शहरातील फेरीवाले, हातगाडीवाले, टपरीवाले, भाजीविक्रेते यांची अमानुष पद्धतीने पिळवणूक सुरू आहे. रस्त्यांच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. जोपर्यंत शहरातील हॉकर्स झोन जाहीर होऊन त्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत या शहराची दैना संपणार नाही.
तात्काळ हॉकर्स झोन घोषित करा. अन्यथा कॉंग्रेस मनापा सत्ताधारी, प्रशासनाच्या विरोधात खळखट्याक॒ करण्यासाठी रस्त्यावर उतरेल, असा सज्जड इशारा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिला आहे. प्रोफेसर कॉलनी चौकातील भाजीवाल्यांवरील कारवाईपासून या विषयाला शहरात तोंड फुटले आहे. कॉंग्रेस याबाबत अधिक आक्रमक झाली आहे.
राष्ट्रीय फेरीवाला धोरणाचा सखोल अभ्यास करत शहर जिल्हाध्यक्ष काळे यांनी मनपाच्या विरोधात कॉंग्रेसचा मोर्चा उघडला आहे. मनपातील सत्ताधारी, आयुक्त, अतिक्रमण विभाग प्रमुख तसेच अन्य संबंधित विभागांनी शहराचा चालवलेला खेळखंडोबा थांबवावा.अन्यथा नगर शहरातील नागरिकांसाठी कॉंग्रेसला मैदानात उतरावे लागेल,
असा इशारा काळे यांनी दिला आहे. याबाबत मांडणी करताना काळे म्हणाले की, राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी-चिंचवड आदी मनपांनी काम केले आहे.नगर मनपा मात्र गाढ झोपलेली आहे. सन २००७-२००८ मध्ये राष्ट्रीय फेरीवाला धोरण आले होते.
त्यावेळी नगर मनपाने सर्व्हेक्षण करून शहरातील फेरीवाल्यांची संख्या नोंदणी करून घ्यायची होती. तसेच यासाठीच्या समितीची स्थापना करायची होती. त्या माध्यमातून धोरण निश्चित करून त्याची अंमलबजावणी करायची होती. परंतु त्यामध्ये काहीच काम केले गेले नाही. २०१४ साली सुप्रीम कोर्टाच्या नवीन सूचनांप्रमाणे या धोरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले.
त्यानंतर पुन्हा ही प्रक्रिया नव्याने राबविण्याची गरज होती. महापालिकेने बायोमेट्रिक सर्व्हेक्षण करत या संबंधीची आखणी करण्याची आवश्यकता होती. शहरामध्ये हॉकर्स झोन निश्चित करून तो घोषित करण्याची गरज होती. परंतु कोणत्याही प्रकारची कृती या संदर्भामध्ये महापालिके-च्यावतीने मागील सहा वर्षांमध्ये करण्यात आली नाही.
मनपा कडूनच कायद्याचे उल्लंघन :- याबाबत आक्रमक होत काळे यांनी म्हटले आहे की, या गलथान कारभारामुळे शहरातील हातावरती पोट भरणाऱ्या गोरगरीब लोकांना अजूनही न्याय मिळू शकलेला नाही. अतिक्रमण विभागाचे प्रमुख हे पालिकेचे कर्मचारी, ट्रक, बुलडोजर घेऊन रोज शहरभर कारवाई करत फिरतात.
या अन्यायकारक कारवाईमध्ये अनेकांचे संसार आजवर उध्वस्त झाले आहेत. कारवाई होत असताना गोरगरिबांच्या मालाची नुकसानी होत असते. जप्तीची कारवाई करत असताना मोठा दंड आकारला जातो. मुळात ही कारवाईच बेकायदेशीर स्वरूपाची असल्याची असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे
मनपाच्या गलथानपणामुळेच शहरातील रस्त्यांचा श्वास कोंडला :- मनपाच्या या गलथान कारभारामुळेच नगर शहरामध्ये रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमणे वाढली असून यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांना रस्त्याने जात असताना जीव मुठीत धरून जावे लागते.
रस्त्यांचा श्वास मोकळा करण्यासाठी आम्ही कारवाई करतो असं मनपा सांगत असते. परंतु रस्त्यावरती वाहतूक कोंडी निर्माण होण्यासाठी मनपाच जबाबदार असून फेरीवाला धोरण निश्चित न केल्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना आणि गोरगरीब, छोट्या-छोट्या व्यावसायिकांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याची उद्विग्नता काळे यांनी व्यक्त केली आहे.
मनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा…. :- शहरातली गोरगरिबांची पिळवणूक थांबवत शहरातील रस्त्यांचा श्वास मोकळा करण्यासाठी मनपा सत्ताधारी आणि प्रशासनाने नगर शहरासाठी तात्काळ हॉकर्स धोरण तयार करायला घ्यावे.
शहरातील ट्राफिक आणि गोरगरीब व्यावसायिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडण्यासाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत कारवाई सुरू न केल्यास काँग्रेस आक्रमक होत मनपात खळखट्याक॒ करेल, असा इशारा शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved