मुंबई: करोना काळात अत्यावश्यक सेवा बजावत असतानाही कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने आजपासून बेमुदत बंद पुकारला होता.
परंतु महाव्यवस्थापकांच्या आवाहनानंतर अखेर हे आदोलन मागे घेण्यात आलं आहे. करोना संकटाच्या काळात बेस्ट कामगारांनी कामगार संघटनेला साथ देण्याऐवजी बेस्ट प्रशासनाला साथ दिली.
८० ते ९० टक्के कामगारांनी कामावर हजेरी लावल्याने बेस्टची वाहतूक सुरळीत सुरू होती. शिवाय कामगार कामावर हजर झाल्याने बेस्टला पर्यायी व्यवस्थेची अंमलबजावणी करण्याची गरज पडली नाही.
करोनाच्या काळात कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने आजपासून बेमुदत बंद पुकारण्याचा निर्णय घेतला होता.
परंतु बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी अत्यावश्यक सेवांच्या पार्श्वभूमीवर बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पत्र पाठवत कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर ६० टक्के कर्मचारी कामावर हजर झाले होते.
त्यानंतर संपूर्ण कर्मचारी कामावर हजर झाल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळपासूनच बेस्टचे सर्व कर्मचारी कामावर उपस्थित होते. कल्याण, बदलापूर, पनवेल, वसई, विरार आणि पालघरपर्यंत बेस्टच्या बसेस धावल्या.
सर्व आगारात आवश्यकतेपेक्षा अधिक वाहक, चालक, मॅकेनिक आणि इतर कामगार उपस्थित होते. त्यामुळे शशांक राव यांच्या आंदोलनाचा फुगा फुटला आहे, अशी टीका बेस्ट कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अॅड. उदयकुमार आंबोणकर यांनी केली आहे.