अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-कोरोना या संसर्गाने संपूर्ण जगाला वर्षभरापासून वेठीस धरले आहे. या आजारावर आता लस येणार आहे. काही देशांमध्ये लसीकरण सुरु झाले आहे, तर काही ठिकाणी लवकरच लसीकरणास सुरुवात केली जाणार आहे.
भारतातही लवकरच कोरोनावरील लस उपलब्ध होण्याची चिन्ह आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने अद्याप कोरोना लस मोफत देण्याची कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र, राज्यात केंद्रानं दिलेल्या निर्देशानुसार लसीकरणाची संपूर्ण तयारी सुरु असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
केरळ, मध्यप्रदेश, आसाम, तेलंगणा, तामिळनाडू आदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, आम्ही मोफत करोना लस देणार आहोत. महाराष्ट्रातील जनतेला देखील करोना लस मोफत मिळावी, अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तसं निर्णय जाहीर करावा,’ अशी मागणी माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली.
नगर जिल्हा भाजपच्या वतीने आज, रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर आदी उपस्थित होते.
नगर जिल्ह्यात निर्माण झालेल्या बिबट्याच्या प्रश्नावरुन यावेळी शिंदे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला दरम्यान विजेचा प्रश्नावरून शिंदे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले, ‘महाराष्ट्र तोच आहे. या महाराष्ट्रात २०१९ पूर्वी कधीही लाईट जात नव्हती, डीपी जळल्याच्या तक्रारी होत नव्हत्या,
ऑइल संपत नव्हते आणि संपले तरी तात्काळ देत होतो. पण त्याच महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन नंतर शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अडचणीत आला आहे, त्याला लाईट वेळेवर मिळत नाही, मिळाली तर पूर्ण दाबाने मिळत नाही. अशा पद्धतीने जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय विजयाच्या संदर्भात नैराश्याचे वातावरण आहे. असेही ते यावेळी बोलले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com