अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- सध्या पाऊस सर्वत्र जोरदार हजेरी लावत आहे. त्यामुळे अनेक तालुक्यांतील खरीप पिकांवर पाणी फेरले गेले आहे.
मागील काही दिवसांच्या जोरदार पावसामुळे राहाता तालुक्यातील अनेक शेतकर्यांची सोयाबीन, घास, डाळिंब, कपाशी, उसासह सर्वच पिकांची नासाडी झाली आहे.
यात खरिपाच्या पिकांसह गळिताला आलेल्या उसाच्या फडाचेही मोठे नुकसान झाले आहे. या पावसाने शिवारातील ऊस पिके पडल्याने नुकसान झाले आहे.
सोंगणीला आलेली पिके वाया जाण्याचे चिन्ह दिसत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.राहाता तालुक्यात गेल्या पंधरा वर्षात अशाप्रकारे पाऊस झाला नाही, असे अनेकांचे अंदाज आहे.
यावर्षी पूरक हवामान असल्यामुळे पावसाने तालुक्यात दमदार हजेरी लावली. सर्व गावातील ओढे-नाले ओसंडून वाहू लागले. अनेक ठिकाणी ओढ्यांना पूर आल्याने रस्त्यांवरून पाणी वाहिले. अनेक गावातील विहिरी तुडुंब भरल्या. हाताने पाणी घेता येईल,
अशीच स्थिती बऱ्याच ठिकाणी पाहावयास मिळाली. राहाता परिसरात पेरू, चिकू, डाळिंब, द्राक्षे, ऊस हे पिके मोठ्या प्रमाणात आहे. सध्या पेरू हे फळ काढण्यासाठी आले आहे.
परंतु पावसामुळे या फळबागांना मोठा फटका बसला. 6 जून ते 20 सप्टेंबर या कालावधीमध्ये राहाता शहरात 928 मिमी तर शिर्डीमध्ये 678 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात अनेक तालुक्यांत जून, जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या पावसामुळे खरीप पिकांची चांगलीच दाणादाण उडाली. मका, कपाशी, ऊस, सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन उभी असलेले पिके भुईसपाट झाले आहे.
या पावसामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाने कुठे शेतात पाणी साचले. तर कुठे बाजरी पीक भूईसपाट झाले. परिसरातील बाजरी, भुईमूग, मका, ऊस, जनावरांचा चारा आदी पिकांमध्ये पाणी साचले.
त्यामुळे शेतकर्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकर्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने तातडीने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved