‘हिंदकेसरी’ वस्ताद श्रीपती खंचनाळे यांच्या निधनानं कुस्ती चळवळीचा मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-महाराष्ट्राच्या कुस्तीक्षेत्रातलं ऋषीतुल्य व्यक्तिमत्व, हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी पहेलवान, वस्ताद श्रीपती खंचनाळे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून राज्याच्या कुस्ती चळवळीचा आधारस्तंभ, उदयोन्मुख कुस्तीपटूंचे मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत आज काळाच्या पडद्याआड गेला आहे.

अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी स्वर्गीय श्रीपती खंचनाळे यांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की,

श्रीपती खंचनाळे साहेब बेळगावच्या एकसंबा गावातून कोल्हापूरात आले आणि कोल्हापूरचेच होऊन गेले. कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या कुस्ती चळवळीशी एकरुप झालेलं त्यांचं व्यक्तिमत्व होतं.

1959 ला दिल्लीत झालेल्या कुस्तीत त्यांनी त्यावेळचा दिग्गज पहेलवान रुस्तम-ए-पंजाब बत्तासिंगला हरवून हिंदकेसरी झाले. श्रीपती खंचनाळे साहेबांनी त्यांच्या जीवनात अनेक कुस्त्या जिंकल्या.

वडिलांकडून आलेला कुस्तीचा वारसा त्यांनी पुढच्या पिढीपर्यंत, राज्यातल्या अनेक पहेलवानांपर्यंत पोहचवला. राष्ट्रीय तालिम संघाचं अध्यक्ष म्हणूनही खंचनाळे साहेबांनी काम केलं. त्यांच्या निधनानं राज्याच्या कुस्ती क्षेत्राती मोठी हानी झाली आहे.

महाराष्ट्रातील कुस्ती चळवळीला व कुस्तीपटूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवून देणं, हीच खंचनाळे साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News