उद्धव काळापहाड ,अहमदनगर :- खाकीच्या हातातला दांडा पहा आणि माणूसकीचा दुसरा हातही पहा असं म्हणण्याची आता वेळ आलीय. कोरोनाशी सगळं जग एक दोनहात करतंय, हे संकट एवढं भयंकर आहे की माणसं आतून बाहेरून हादरून गेलेत. समोर मृत्यूचे महाभयंकर तांडव दिसते आहे, यात भेदरलेले लोकं अगदी स्वतःलाही पाहतायत. ज्यांना गांभीर्य आहे ते जगतील आणि ….? इतर…?? असो….
लॉकडाऊन हा शब्द आणि परिस्थिती पहिल्यांदा ऐकली अनुभवली , असं असताना याचा मजाक करणारेही आपल्याच आजूबाजूला पाहायला मिळतात. ज्यांना गांभीर्य कळत नाही त्यांना पोलिसांनी आपल्या काठीने सरळ केलं. ते गरजेचे असताना अनेकांनी पोलिसांना मात्र अतिरेक करत आहेत, म्हणणं ऐकून न घेताच कारवाई करत आहेत अशी टीकाही केली. कुणी कुणाच्या संपर्कात येऊ नये आणि कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सगळ्यांनी घरातच बसण्याचं आवाहन वारंवार होत असताना काही निर्बुद्ध, टारगट,समाजकंटक लोकं मात्र निर्लज्जपणे रस्त्यावर बिनकामाचे फिरताना दिसतात.
अशा वेळी हा खाकी वर्दीतला देवदूत तुमच्याकडे येणाऱ्या यमदेवाच्या रेड्याला आडवतोय त्याच्याशी दोन हात करतोय. त्यालाही कुटुंब आहे. आपली काळजी असणारी माणसं आहेत. त्यालाही धोका आहे. हा धोका पत्करून हा माणूस अहोरात्र रस्त्यावर आपला पांडुरंग बनून उभाय. संकटकाळी त्याला थोडंस कठोर व्हावं लागलंय, मात्र या कठोर होण्यामागे आपलीच काळजी आहे. अत्यावश्यक काम नसतानाही बाहेर मोकाट फिरणाऱ्यांवर कारवाई होणं ही आताच्या काळाची गरज आहे. लाखो वारकऱ्यांचा लाडका विठ्ठल कर कटेवरी ठेऊन विटेवर उभा राहून आपल्या हिताची काळजी वाहतो.
अखंड जगाचा मालक म्हणून तो आपली काळजी घेत चंद्रभागेतीरी उभा आहे.. महाराष्ट्रावर जेंव्हा जेंव्हा संकट येतं तेंव्हा तेंव्हा मराठी माणूस आपुलकीने पांडुरंगाचा धावा करतात. काही चांगलं झालं की पांडुरंग पावला असं आपण म्हणतो ना? मग रस्त्यावर खाकी वर्दी घालून उभे असलेले पोलीस हेही आपल्या हिताची काळजी वाहत आहेत, आपल्याच कल्याणासाठी. हातात दंडुकं घेऊन वाटेवरी उभा असलेल्या खाकी वर्दीतल्या पांडुरंगाला आपण साथ दिली पाहिजे हे आपलं पहिलं कर्तव्य आहे.
पोलिसांच्या एका हातातला दांडा आपल्याला दिसतो पण त्याने अनेक वंचित घटकांची भूक भागवलीय त्या त्याच्या दुसऱ्या हातात गोर गरिबांसाठी धान्य, किराणा आहे. पोलिसांची माया पाहून भटक्या विमुक्तांच्या झोपड्या गदगदून गेल्या आणि पोलिसांच्या मायेने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आलेले आपण पाहिले. ज्यांचं हातावर पोट आहे असे अनेक समाजघटक हे झोपड्यात, पालात राहतात, ज्यांना स्वतःच घर नाही ,जागा नाही असे कुटुंब भुकेने तडफडत असताना अहमदनगर पोलिसांनी शहराचे डी वाय एस पी संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली या भुकेल्या माणसांची भूक भागवली.
शहरातील झोपडपट्टीत राहणारा दलित, अल्पसंख्याक समाज, शहराबाहेर तंबू ठोकून राहणारा डोंबारी, पारधी, बहुरूपी, गोसावी इत्यादी समाजातील गरजू लोकांना पोलिसांनी अन्नधान्य सेवा पुरवली आहे. खरंतर निवडणुका सोडून अशी काही मदत आपल्या झोपडी पर्यंत आलीय हे पाहण्याची या घटकांना सवयच नसते. अशा लोकांपर्यंत हे खाकी वर्दीतले देवदूत पोहचले आहेत. एक महिना पुरेल असा किराणा आणि धान्य याचे वाटप हे पोलीस आपला जीव धोक्यात घालून करतायत.
मग पोलिसांच्या काठीची भीती बाळगणारे आपण त्यांच्या या दुसऱ्या बाजूच्या पुण्यकर्माचेही कौतुक करूया ना!. पोलीस मारतायत म्हणून घाबरून बाहेर पडायचं नाही असा एक समज अनेकांचा झालेला आहे, पण एका जागतिक संकट असलेल्या संसर्गजन्य रोगाशी आपण मुकाबला करतोय. आपल्या आणि इतरांच्या काळजीपोटी आपल्याला बाहेर पडायचं नाहीय हे आधी आपण ध्यानात घेतलं पाहिजे.
आपण नाहक बाहेर फिरत असू तर आपण समाजकंटक ठरतो आणि अशा दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी तर पोलीस लाठीचा उपयोग करतायत. गोरगरीब जनतेला दोनवेळच्या जेवणाची चिंता आहे. ती चिंता याच पोलिसांनी दूर केलीय. खाकीतला देवमाणूस या भटक्यांनी, वंचितांनी,गरजू लोकांनी याची देही याची डोळा पाहिला आहे. आपली भूक भागवणारा हा देवमाणूस रस्त्यावर उभाय त्यांना सहकार्य करा अशी आर्त साद घालताना दिसणारी झोपडीतील माणसं शहाणी आणि मोक्कार बोंबलत फिरतारी ती माणसं अक्कलशून्यच म्हणावी लागतील .
‘हमारे पास लाठी भी है, और गरीबोंके लिये जो घरपर बैठते हैं उनके लिये बहुत सारा प्यार भी है’ असं या खाकी पोषाखात असलेल्या पांडुरंगाने दाखवून दिले आहे. अहमदनगर पोलीस जगद्गुरू तुकोबा रायांच्या शिकवणीप्रमाणे वागताना दिसत आहेत. ” नाठाळ्यांच्या माथी हाणू काठी ” आणि ” जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले ” या तुकोबांच्या ओळी पोलीस बांधव सार्थ करीत आहेत. आपलं कुटुंब ,आपलं सुख सगळं विसरून आपल्यासाठी वाटेवर उभा असलेल्या या देवमाणसाला साथ देऊयात. घरात बसा, स्वतःची व इतरांची काळजी घ्या..
उद्धव काळापहाड,
9393895050
( निवेदक, पत्रकार अहमदनगर )