भांडण सोडवण्यास गेलेल्या काकाचा पुतण्यानेच केला खून !

Ahmednagarlive24
Published:

चाळीसगाव :- पिलखोड येथे भांडण सोडवण्यास गेलेल्या काकाचा पुतण्यानेच चाकू खुपसून खून केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी झालेल्या या हल्ल्यात काकाचा मृत्यू झाला तर मुलगाही गंभीर जखमी झाला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दोघा सख्या भावांना ताब्यात घेतले आहे. धोंडू सुपडू पाटील (वय ५५) असे मृत काकाचे नाव असून, त्यांचा मुलगा महेश धोंडू पाटील (वय २८) हा गंभीर जखमी झाला आहे.

मृत धोंडू पाटील व त्याचे धाकटे भाऊ बंडू सुपडू पाटील हे दोघे पिलखोड येथे शेजारी-शेजारी राहतात. गुरुवारी दुपारी बंडू पाटील यांचे दोघ मुलं संशयित आरोपी निखील बंडू पाटील (वय २८) व गौरव बंडू पाटील (वय २२) यांच्यात त्यांच्या घरात वाद झाले.

हा वाद सुरू असताना निखीलचा चुलत भाऊ महेश व काका धोंडू पाटील हे वाद सोडवण्यासाठी गेले. त्यावेळी निखील व गौरव यांनी त्यांच्याशी वाद घातला.

त्यावेळी महेश याचे वडील धोंडू पाटील हे आले. ते बोलत असताना रागाच्या भरात गौरव याने घरातील चाकू धोंडू पाटील यांच्या पोटात खुपसला. त्यावेळी महेश हादेखील आपल्या वडिलांना वाचविण्यासाठी धावला असता त्याच्यावरही हल्ला करून चाकूने वार केले.

चाकूचा वार झाल्याने दोघे बाप-लेक जमिनीवर कोसळले. त्यानंतर त्यांना नातेवाईक तत्काळ उपचारासाठी चाळीसगाव येथे आणत असताना रस्त्यातच धोंडू पाटील यांचा मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या महेश यास चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

मृत धोंडू पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी मेहूणबारे पोलिस ठाण्यात निखील व गौरव पाटील या दोघांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment