मुंबई : राज्यात लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. राज्यातील जनतेने अतिशय सुस्पष्ट जनादेश दिलेला असताना सुद्धा महाराष्ट्रात कोणतेही सरकार स्थापन न होणे आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागण्याचा प्रसंग राज्यावर ओढवणे, हे अतिशय दुर्दैवी आहे.
मात्र, लवकरच राज्याला स्थिर सरकार प्राप्त होईल, अशी आपण अपेक्षा व्यक्त करतो, असे त्यांनी म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अतिशय सुस्पष्ट जनादेश महायुतीला मिळाला होता.
तथापि राज्यात सरकार स्थापन होऊ शकले नाही आणि त्यामुळे आपल्याला राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागले. आज राज्यापुढे अनेक प्रश्न आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अवकाळी पावसाने आपला बळीराजा संकटात आहे.
राजकीय अस्थिरतेमुळे राज्यात होणाऱ्या गुंतवणुकीवर विपरित परिणाम होईल. सरकारचे दैनंदिन कामकाज प्रभावित होईल आणि त्यातून पर्यायाने जनतेचीच गैरसोय होते.
म्हणूनच माझी अपेक्षा आहे की, सर्वच पक्ष या स्थितीचा गांभीर्याने विचार करतील आणि राज्याला स्थिर सरकार लवकरच मिळेल, अशी आपण अपेक्षा करतो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.