अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पारनेर विधानसभेतील पराभवापेक्षा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले याचा मला आनंद असल्याचे सांगत माजी आमदार विजय औटी यांनी निकालानंतर प्रथमच कार्यकर्त्यांसमोर भाषण केले.
अडीच महिन्यांत राजकारणात अनेक बदल झाले आहेत, असे सांगत योग्य वेळी मी राजकीय भाष्य करेन, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
पं. स. सभापती निवडणुकीत शिवसेनेचे गणेश शेळके बिनविरोध विजयी झाल्यानंतर औटी यांच्या संपर्क कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.
माजी जि. प. सदस्य सुजित झावरे, जि. प. सदस्य काशीनाथ दातेे, जयश्री औटी, रामदास भोसले, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले, बाबासाहेब तांबे, अशोक कटारिया,
डॉ. श्रीकांत पठारे, ताराबाई चौधरी, राहुल शिंदे, बाळासाहेब पठारे, विजय डोळ, वर्षा नगरे, शंकर नगरे, नीलेश खोडदे या वेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वतीने शेळके यांचे अभिनंदन करत असल्याचे सांगून औटी म्हणाले, ज्या पक्षाने मला १५ वर्षे आमदारकी दिली, त्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले याचा माझ्या पराभवापेक्षा मला मोठा आनंद आहे.
मुख्यमंत्रिपद मोठे असतानाही आठ दिवसांपूर्वी रात्री बारा वाजता फोन करून ठाकरे यांनी आपल्यावर काही जबाबदारी सोपवली असल्याचे औटी यांनी या वेळी सांगितले.
तालुक्याच्या राजकारणात पंचायत समितीचे सभापतिपद हे दुसऱ्या क्रमांकाचे पद आहे. शिवसेनेसह मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचा सल्ला औटी यांनी दिला.