अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- 2020 ह्या नव्या वर्षात पदार्पण करताना अहमदनगर शहर खड्डे मुक्त करण्याचा संकल्प आहे. तो यशस्वी होईल,’ असा विश्वास नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केला.
मंगळवारी शहरातील नीलक्रांती चौकात सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांच्या पाहणीनंतर त्यांनी खड्डेमुक्त नगरचा संकल्प व्यक्त केला. दरम्यान, शहरातून जाणाऱ्या विविध महामार्गांच्या दुरुस्तीच्या कामांची पाहणीही त्यांनी केली.
नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील बोल्हेगाव फाटा व शिंगवे नाईक तसेच नगर शहरातील नीलक्रांती चौक, नगर-पुणे बाह्यवळण रस्ता व इतर रस्ते दुरुस्ती कामांची पाहणी डॉ. विखे यांनी केली.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासह बोल्हेगाव फाटा परिसरातील रहिवासी तसेच शिंगवे नाईकचे ग्रामस्थ यात सहभागी झाले होते.
‘शहर व महामार्गावरील नवे रस्ते तसेच रस्ते दुरुस्तीच्या विविध कामांची आश्वासने आपण नागरिकांना दिली होती, त्यांची पूर्तता होत असल्याचे समाधान आहे,’ असेही डॉ. विखेंनी आवर्जून सांगितले.
या पाहणी दौऱ्यात दुरुस्ती सुरू असलेल्या कामातील अडथळे दूर करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.