अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी :- कंकणाकृती सूर्यग्रहण दि. २६ डिसेंबर रोजी असल्याने श्री साईबाबा समाधी मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
या दिवशी सकाळी ८ ते ११ यावेळेत दर्शनासाठी समाधी मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
यावेळी बोलताना मुगळीकर म्हणाले कि, दि. २६ डिसेंबर रोजी सकाळी ८.०५ ते ११ याकाळात कंकणाकृती सूर्यग्रहण आले आहे.
त्यामुळे श्री साईबाबा समाधी मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमांमध्ये बदल करण्याबाबतचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला आहे.
सकाळी आठ वाजता श्रींचे दर्शन बंद होईल. सकाळी ८.०५ वाजता समाधी मंदिरात मंत्रोच्चार सुरू होईल, सकाळी ११ वाजता मंत्रोच्चार संपल्यानंतर श्रींचे मंगलस्थान होवून श्रींची ‘शिरडी माझे पंढरपूर’ आरती होईल.
ग्रहण काळात अभिषेक पूजा बंद ठेवण्यात आल्यामुळे त्या काळातील ऑनलाईन बुकींग केलेल्या साईभक्तांकरिता सकाळी सात ते आठ यावेळेत श्री साईसत्य व्रत व अभिषेक पूजेचे आयोजन करण्यात आले आहे.