आता कोण होणार अहमदनगरचा पालकमंत्री ?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आता पालकमंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार, यावरून आता चर्चेला सुरवात झाली आहे.पालकमंत्रिपदासाठी शहर-जिल्ह्यात इच्छुकांमध्ये तीव्र स्पर्धा आहे.

मंत्रीपदासाठी जिल्ह्यातील कोणत्या नेत्याची वर्णी लागणार यावर पालकमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे ठरेल. शहर अथवा जिल्ह्यातील इच्छुकांना संधी मिळाली, तर पालकमंत्रिपद त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.

विधानसभेचा निवडणूक निकाल लागून आठ दिवस झाले तरी भाजप-सेनेच्या युतीचा सत्तेचा मुर्हूत अजून ठरत नसल्याने मुळे सत्तेची बेरीज नेमकी कशी जुळवली जाणार, तसेच या समीकरणांवर नगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी ठरणार असल्याने याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

सध्या नगर जिल्ह्यातून पालकमंत्री पदासाठी भाजपचे निवडून आलेले ना. राधाकृष्ण विखे,आ.  बबनराव पाचपुते, ,आ.मोनिका राजळे,व नुकतेच शिवसेनेला पाठींबा दिलेले आ.शंकरराव गडाख यांचे नाव अग्रक्रमावर आहे. 

निकाल लागल्यानंतर भाजपच्या पराभूत सर्व आमदारांनी राजळे व जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत राधाकृष्ण विखे यांना मंत्रीपद देवू नये अशी मागणी केल्याने जिल्ह्यात विखे यांच्याविरोधातील संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

विखे यांचे नाव मागे पडले तर दुसऱ्यांदा आमदार झालेल्या राजळे यांना ही संधी मिळण्याची शक्‍यता आहे. मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात पालकमंत्री राहिलेले बबनराव पाचपुते आठ दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहेत.

भाजप-सेना युती झाली तरी नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठींबा दिल्याने तेही भाजपचे राधाकृष्ण विखे, आमदार बबनराव पाचपुते व आमदार मोनिकाताई राजळे यांच्याबरोबर पालकमंत्री पदाच्या स्पर्धेत आले आहेत. 

शिवाय शिवसेना पारनेरचे विजय औटी व नगर शहराचे अनिल राठोड या दोन पराभूत आमदारांना विधानपरिषदेवर संधी देणार असल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास मग तेही पालकमंत्रीपदावर दावा करतील. 

शिवाय भाजप आधीचे पालकमंत्री राम शिंदे यांचे पुन्हा पुर्नवसन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार यांच्या विरोधात ताकद देण्यासाठी शिंदे यांना विधानपरिषदेवर घेवून पालकमंत्रीपदाची पुन्हा संधी दिली जावू शकते.

सध्या भाजपतच पालकमंत्री पदाची चढाओढ व अंतर्गत कुरघोडी सुरु झालेल्या आहेत. त्यामुळे भाजपत आलेल्या दोन्ही कॉंग्रेसच्या कुरघोडीचे राजकारण भाजपच्या शिडातही घुसल्याचे चित्र दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment