Maharashtra News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्ष्यामुळे देशातील जनमत भारतीय जनता पक्षाच्या मागे उभे राहिले आहे. आगामी निवडणुकीनंतर देखील पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन होईल,
असा विश्वास व्यक्त करतानाच ‘काँग्रेसने इतरांवर टीकाटिपणी करण्यापेक्षा लोक आपल्या पक्षाला का सोडून जात आहेत? याचे आत्मचिंतन करावे,’ असा सल्ला भारतीय जनता पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार राम शिंदे यांनी दिला आहे.
सोमवारी (दि.१२) जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीसाठी आमदार राम शिंदे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते.
बैठकीनंतर त्यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या वकील मंडळींच्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते.
यावेळी थोरात यांनी ‘केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावातून विरोधी पक्षाचे नेते फोडण्याचे काम भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे.’ असा आरोप केला होता. याकडे लक्ष वेधले असता आ. शिंदे म्हणाले, बाळासाहेब थोरात हे अनुभवी नेते आहेत. त्यांच्यापेक्षा मी लहान आहे.
मात्र, आपल्या पक्षातील लोक पक्ष सोडून जात असतील तर त्याबाबत काँग्रेस पक्षाने आणि नेतेमंडळींनी आत्मचिंतन करावे. राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण भाजपामध्ये सामील होण्याविषयी लक्ष वेधले असता
आ.राम शिंदे म्हणाले, लोक नेहमी प्रवाहच्या सोबत राहतात. पूर्वीच्या काळी भारतीय जनता पक्षाशी कोणी जवळीक करीत नव्हते. भाजपला नावे ठेवणारेच आता भाजप पक्षप्रवेशाच्या वेटिंग लिस्टमध्ये आहेत.
कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथे तलाठी कार्यालयासाठी दोन वर्षांपूर्वी प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र, त्यावर अद्याप कार्यवाही झाली नाही. या दिरंगाई बद्दल जे जबाबदार असतील त्यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
सीना आवर्तनासाठी कडाडले शिंदे
सीना धरणातून आवर्तन सोडण्याच्या मुद्द्द्यावरून टंचाई बैठकीमध्ये माजी मंत्री आ. शिंदे चांगलेच कडाडले. धरणात एकूण पाणीसाठा किती ? त्यातील उपयुक्त साठा किती ?
रोटेशनसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची आवश्यकता कधी असते ? त्यासंबंधीचा कायदा काय सांगतो ? पाणी उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना बैठकीस काय म्हणून धरले ? अशा एका मागून एक प्रश्नांच्या फैरी आमदार राम शिंदे यांनी झाडल्या.
जलसंपदाचे कार्यकारी अभियंता जयंत देशमुख यांना धारेवर धरले. सीना धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी केली. तसेच लोकांमध्ये शासनाविषयी लोकक्षोभ होईल,
असे कृत्य केल्याने देशमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आ. शिंदे यांनी केली. त्यावर सीना धरणातून पाणी सोडण्याचे निर्देश पालकमंत्री विखे पाटील यांनी दिले.